आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झरदारींचा पक्ष पिछाडीवर, शरीफ-इम्रानला आघाडी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- रक्तरंजित प्रचाराच्या पार्श्वभूमीनंतर पाकिस्तानात आज सकाळी संसद आणि चार प्रांतिक मंडळांकरिता कडक बंदोबस्तात मतदान झाले. त्‍यानंतर लगेच मतमोजणी सुरु झाली असून नवाझ शरीफ यांचा पक्ष पीएमएल (एन) आणि इम्रान खानचा पीटीआय पक्षाला आघाडी मिळाली आहे. तर राष्‍ट्रपती आसिफ अली झरदारी यांचा पीपीपी पक्ष पिछाडीवर असल्‍याचे चित्र आहे.

कराची व पेशावरसह 4 शहरांमध्‍ये झालेल्या बॉम्बस्फोटामुळे मतदानावर मोठा परिणाम झाला. दुपारी तीनपर्यंत केवळ 25 टक्के मतदान होऊ शकले. दरम्यान, बॉम्बस्फोटातील मृताचा आकडा वाढला असून तो 25 वर पोहचला आहे. तर, जखमींची संख्या 198 वर पोहचली आहे. सायंकाळी 7 वाजता मतदान संपले. त्‍यानंतर मतमोजणी सुरु झाली आहे. नवाज शरीफ पंजाबमधील सरगोधा येथून तर इम्रान खान पेशावर आणि मियांवली येथून आघाडीवर आहे. इम्रान खानने 4 ठिकाणंवरुन निवडणूक लढविली आहे.

पाकिस्तानमधील संसदेच्या कनिष्ठ सभागृह नॅशनल असेंब्लीच्या एकूण 342 जागांपैकी 272 जागांसाठी आज मतदान होत आहे. याचबरोबर चार प्रांतिक मंडळाकरिताही मतदान होत आहे. काही ठिकाणी मतदान वेळेत सुरु झाले नाही. कारण अनेक मतदान केंद्रावर बॅलेट बॉक्स पोचले नसल्याचे निवडणुक आयोगाने म्हटले आहे. तसेच ज्या ठिकाणी वेळेत मतदान सुरु झाले नाही त्या ठिकाणी उशिरापर्यंत मतदान घेतले जाईल, असेही निवडणुक आयोगाने स्पष्ट केले.

कराचीजवळील कायदाबादमध्ये दोन बॉम्बस्फोटात ११ लोकांचा मृत्यू झाला. त्यात आता आणखी वाढ झाली. हा स्फोट अवामी पार्टीच्या कार्यालयाच्या बाहेर झाला. एका रिक्षात हा स्फोट घडविला. दरम्यान, पेशावरमधील चारअड्डा रोडवर झालेल्या बॉम्बस्फोटात पाच जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.


गेल्या 62 वर्षांमध्ये प्रथमच लोकनियुक्त सरकारकडून सत्तांतर होत आहे. नव्या संसदेतही कुण्या एका पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नाही, परंतु माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा पक्ष सर्वाधिक जागा जिंकेल, असा मतदानपूर्व चाचणीतील अंदाज आहे. मात्र, लष्कराचे पाठबळ असलेला क्रिकेटपटू इम्रान खानचा पक्षही या निवडणुकीत चमत्कार दाखवू शकतो.

प्रमुख पक्ष - शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग (पीएमएल-एन), इम्रानचा तेहरिक-ए-इन्साफ यांच्याव्यतिरिक्त झरदारींचा पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी), सरहद्द गांधी - खान अब्दुल गफार खान संस्थापक असलेला अवामी नॅशनल पार्टी (एएनपी) मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट (एमक्यूएम ) हे प्रमुख व जमियत उलेमा ए इस्लाम, बलुचिस्तान नॅशनल पार्टी-मेंगल छोटे पक्ष रिंगणात आहेत.