आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Genral Election Candidate Shahabaj Sharif

दाढी नसल्याने शाहबाज शरीफ यांच्या उमेदवारीला विरोध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर - पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजचे (पीएमएल-एन) नेते शाहबाज शरीफ यांनी दाढी काढून टाकल्याचे कारण देत दोन व्यक्तींनी त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे. दाढी ठेवणारा माणूस सच्चा मुस्लिम समजला जातो, त्यामुळे शरीफ याचे पालन करत नसल्याचा दावा बाबर अमीन आणि सईद इक्तिदार यांनी केला आहे.
अमीन आणि इक्तिदार यांनी शरीफ यांच्या लाहोर विधानसभेच्या दोन मतदारसंघातील उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे. अल्लाहचे अनुयायी दाढी राखतात. मात्र, शरीफ यांनी मुस्लिम असूनही दाढी ठेवली नाही, असा आक्षेप निवडणूक अधिकार्‍याकडे नोंदवण्यात आला आहे. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे लहान बंधू असलेल्या शाहबाज शरीफ यांनी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून आश्वासनाची पूर्तता केली नाही. घटनेच्या कलम 62 व कलम 63 नुसार शरीफ विधानसभा सदस्यत्वासाठी पात्र नाहीत. त्यांनी मालमत्तेची, बँक कर्जाची माहिती उघड केली नाही. शरीफ यांनी उमेदवारी अर्जावर राजकारण हा व्यवसाय असल्याचे म्हटले आहे.

उमेदवारी अर्जाची छाननी करताना प्रश्नोत्तरे
पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये इस्लामचा पगडा असल्याचे स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्जामध्ये कुराण व इस्लामविषयक प्रश्न आहेत. अर्जांच्या छाननीवेळी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना इस्लामविषयक प्रश्नांची उत्तरे देताना तारांबळ उडत आहे. विविध मतदारसंघांतील निवडणूक अधिकारी उमेदवाराला आठवत असलेली कुराणातील आयते म्हणण्यास सांगतात. आणि नमाज पठणाची पद्धतही विचारली जाते.

भलत्याच चौकश्या
काही अधिकार्‍यांकडून वैयक्तिक प्रश्न विचारले जातात. लाहोरमध्ये निवडणूक आयुक्त अनवर मेहबूब यांनी तय्यब सोहेल चीमा या महिला उमेदवाराला म्हटले की, तुम्ही 35 वर्षांच्या वाटत नाहीत. तुम्ही तरुण आहात हे दाखवण्यासाठी लोकांना संपूर्ण चेहरा दाखवा. मेहबूब यांनी एका महिला उमेदवाराचे पती शाहिद सोहेल यांना वैवाहिक जीवनावर पाठ दिला. ते म्हणाले, तुमची पत्नी खासदार किंवा आमदार झाली तर तिला मुलांकडे व कुटुंबाकडे लक्ष देण्यास वेळ राहणार नाही. यामुळे तुमचे कुटुंब उद्ध्वस्त होईल.

परफ्यूम लावल्यावर...
विशेष म्हणजे कट्टरपंथीय जमात-ए-इस्लामच्या उमेदवाराला धार्मिक प्रश्नाचे उत्तर देताना अडचणी येत असल्याचे दिसून आले. सिंधमधील एका धार्मिक पक्षाच्या उमेदवाराला परफ्यूम लावल्यानंतर नमाज अदा करता येते का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. परफ्यूममध्ये अल्कोहोल नसेल तर काही हरकत नाही, असे उत्तर संबंधित उमेदवाराने दिले.