आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकचा ‘ब्रिटिश’ गृहमंत्री ‘सस्पेंड’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- दुहेरी नागरिकत्वामुळे पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांचे संसदेचे सदस्यत्व सर्वोच्च न्यायालयाने निलंबित केले आहे. मलिक हे पाकिस्तान आणि ब्रिटनचे नागरिक असून संसदेचे सदस्य होण्यापूर्वी त्यांनी ब्रिटनचे नागरिकत्व सोडले नाही, असा त्यांचावर आरोप होता. मलिक हे ब्रिटनचे नागरिकत्व सोडल्याचे सिद्ध करू शकले नसल्यामुळे त्यांचे सदस्यत्व निलंबित करण्यात येत असल्याचे पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
मलिक हे पाकिस्तानी संसदेचे वरिष्ठ सभागृह सिनेटचे सदस्य असून मागील चार वर्षांपासून ते पाकिस्तानच्या गृहमंत्रीपदाची सूत्रे सांभाळत आहेत. मलिक यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निकाल सर्वाेच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती इफ्तिखार महम्मद चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने सोमवारी दिला. संसदेच्या कोणत्याही सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा मुद्दा न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाहेरचा आहे, असे अ‍ॅटर्नी जनरल इरफान कादीर यांनी न्यायालयाच्या या निकालानंतर म्हटले आहे. तत्पूर्वी मलिक यांच्या वकिलांनी मलिक यांनी ब्रिटनचे नागरिकत्व सोडले असल्याचे न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र मलिक जेव्हा संसदेचे सदस्य झाले तेव्हा त्यांच्याकडे दुहेरी नागरिकत्व होते, हे स्पष्ट होत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. महम्मूद अत्तर नकवी नावाच्या व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
सल्लागारपदी नियुक्ती होण्याची शक्यता
संसदेचे सदस्यत्व निलंबित झाल्यामुळे 60 वर्षीय मलिक यांना गृहमंत्रीपदावरही राहाता येणार नाही, असे कायदेतज्ज्ञांना वाटते. 1990 मध्ये मलिक यांनी ब्रिटनचे नागरिकत्व स्वीकारले होते. तेव्हा ते ब्रिटनमध्ये ऐच्छिक विजनवासात राहात होते. ब्रिटनमध्ये त्यांचे व्यावसायिक हितसंबंध असल्याचे सांगण्यात येते. एका खासजी सुरक्षा कंपनीत त्यांची भागीदारी आहे. मलिक यांचे सिनेटचे सदस्यत्व रद्द झाल्याने त्यांना गृहमंत्रीपदी ठेवता येणार नसल्याने त्यांना केंद्र सरकारच्या सल्लागारपदी नियुक्त करण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कागदपत्रे बोगस
मलिक यांचे वकील चौधरी अजहर यांनी कागदपत्रे सादर करून संसद सदस्य होण्यापूर्वीच मलिक यांनी ब्रिटनचे नागरिकत्व सोडल्याचा दावा केला मात्र न्यायालयाला ही कागदपत्रे सत्य वाटली नाही. ब्रिटिश नागरिकत्व सोडल्याबाबतची सादर करण्यात आलेली कागदपत्रे सत्य नाहीत, असे न्यायमूर्ती जव्वाद ए ख्वाजा यांनी म्हटले आहे.

अर्थमंत्र्यालाही नोटीस
दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्द्यावर न्यायालयाने आणखी 13 खासदारांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यात सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या सहा, मुत्ताहीद कौमी मुव्हमेंटच्या दोन आणि मुस्लिम लीग (नवाज )या विरोधी पक्षाच्या पाच खासदारांचाही समावेश आहे. नोटिसा बजावण्यात आलेल्यांमध्ये पाकिस्तानचे अर्थमंत्री हाफीज शेख, सिनेटचे उपाध्यक्ष साबीर बलोच आणि विरोधी पक्षाचे ज्येष्ठ खासदार ख्वाजा आसीफ यांचाही समावेश आहे. यापूर्वी न्यायालयाने सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या ज्येष्ठ खासदार फरहानाझ इस्फहानी या अमेरिकेच्या नागरिक असल्याच्या आरोपावरून त्यांचे सदस्यत्व रद्द केले होते.
फंडिंगचा पुरावा देऊ; पाकिस्तानचे गृहमंत्री मलिक यांचा दावा
गृहमंत्री मलिक यांच्या भीतीने इजाजचा पाक दौ-यास नकार