शीख संताचा उत्सव / शीख संताचा उत्सव साजरा करण्यास पाकमध्ये मनाई

वृत्तसंस्था

Jul 18,2011 04:14:37 AM IST

इस्लामाबाद: शिखांचे संत शहीद भाई तारू सिंग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी साजºया करण्यात येत असलेल्या महोत्सवास लाहोर येथील गुरुद्वारात मनाई करण्यात आली आहे. शिखांच्या उत्सवापेक्षा मुस्लिमांची ‘शब-ए-बारात’ महत्त्वाची आहे, असे सांगून शीख धर्मीयांना हा उत्सव साजरा न करण्याचे सांगण्यात आले आहे.
लाहोरमधील बरेलवी पंथाच्या दवात-ए-इस्लामी या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुद्वारातील संगीताचे साहित्य फे कून देत शीख धर्मीयांना गुरुद्वारात प्रवेश करण्यासही मनाई केली आहे. शब-ए-बारात उद्या, सोमवारी साजरी केली जाणार असून ती संपेपर्यंत शिखांनी उत्सव साजरा करू नये यासाठी गुरुद्वाराभोवती पोलिस तैनात करण्यात आल्याचे वृत्त पाकमधील दैनिक ‘एक्स्प्रेस ट्रिब्यून’ने दिले आहे. शीख धर्मीयांनी दवातविरोधात ट्रस्टकडे धाव घेतली; पण दवातचे कार्यकर्ते येथे दररोज नमाज अदा करतात, तर शीखधर्मीय वर्षातून एकदाच या ठिकाणी शहीद दिनी येतात. त्यामुळे ट्रस्टनेही हा युक्तिवाद मान्य करून दवातच्या लोकांना ‘शब-ए-बारात’नंतर आपला उत्सव साजरा करण्याचे सांगितल्याचे ट्रस्टचे उपप्रशासक अधिकारी फराज अब्बास यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शीख गुरुद्वाराची आता मशीद झाली असल्याचा दावा दवातचा प्रमुख सोहेल बट याने केला.

वाद काय आहे?
१७४५ मध्ये तत्कालीन पंजाब प्रांताचा गव्हर्नर झकेरिया खानच्या आदेशावरून जुलै महिन्यात शीख संत भाई तारू सिंग यांना फासावर लटकावण्यात आले होते. लाहोरच्या नौलखा बाजार भागात शहीद भाई तारू सिंग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुरुद्वारा उभारण्यात आला. या ठिकाणी दरवर्षी जुलै महिन्यात शीख धर्मीयांतर्फे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. फाळणीनंतर गुरुद्वारावरचा ताबा इव्हक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डाकडे गेला.
‘दवात’चा दावा
चार वर्षांपूर्वी दवात-ए-इस्लामी संघटनेने हा गुरुद्वारा १५ व्या शतकातील मुस्लिम संत पीर शाह काकू यांच्या कबरीवर उभा असल्याचा दावा केला. काकू हे बाबा फरीदुद्दीन गंजश्कर यांचे नातू असल्याचे दवातचे म्हणणे आहे; परंतु गंजश्कर यांचा मृत्यू १२८० मध्ये झाला होता, तर तब्बल २०० वर्षांनंतर म्हणजे १४७७ मध्ये पीर काकू यांचे निधन झाले होते, असे ‘एक्स्प्रेस ट्रिब्यून’ने म्हटले आहे.

X
COMMENT