आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Karachi Terrorist Attack News In Marathi

दहशतवादाचे भूत पाकिस्तानच्याच मानगुटीवर; कराचीत 13 तास चकमक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची- तालिबानी अतिरेक्यांनी रविवारी मध्यरात्रीनंतर येथील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर भयंकर हल्ला चढवला. रात्रीपासून सोमवारी दुपारपर्यंत चाललेल्या 13 तासांच्या धुमश्चक्रीत 29 जणांचा मृत्यू झाला. त्यात 10 अतिरेक्यांचा समावेश आहे. रविवारी रात्री उशीरा झालेल्या हल्ल्यानंतर तब्बल तेरा तास चाललेल्या चकमकीनंतर विमानतळ मोकळा करण्यात आला आहे.

कराची विमानतळावरील हल्ल्याची तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान संघटनेने जबाबदारी घेतली आहे. मध्यरात्रीनंतर जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळावर अतिरेक्यांनी सामान्य नागरिकांना वेठीस धरून अमानुष गोळीबार केला. वेगवेगळ्या गावांत होणार्‍या बॉम्बहल्ल्यात निष्पाप नागरिकांचा मृत्यू होत आहे. त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी आम्ही अजूनही जिवंत आहोत, हा संदेश पाकिस्तानी सरकारला मिळावा म्हणून हल्ला करण्यात आल्याचे तालिबानी अतिरेकी संघटनेचा प्रवक्ता शाहिदुल्ला शाहिद याने म्हटले आहे. अमेरिकेने मानवरहित विमानातून केलेल्या हल्ल्यात तालिबानी म्होरक्या हकिमुल्ला मेहसूदला ठार केले. त्याचा सूड म्हणूनदेखील हे कृत्य करण्यात आल्याचे तालिबानीने स्पष्ट केले आहे. सुरक्षा कारवाई पूर्ण झाली आहे, असे पाकिस्तानी लष्कराचे मेजर जनरल रिझवान अख्तर यांनी सांगितले.

अमेरिकी ड्रोन मोहिमेच्या सुडापोटी हल्ला

अनेक तास गोळ्यांचा आवाज
मध्यरात्रीपासून विमानतळाला दहशतवाद्यांनी काबीज करण्याचा प्रयत्न केला होता. हल्ल्यात 10 दहशतवादी सामील होते. दहशतवाद्यांबरोबर सुरक्षा यंत्रणांची जोरदार धुमश्चक्री झाली. अनेक तास परिसरात गोळीबाराचे आवाज सुरूच होते. अखेर दुपारी सुरक्षा यंत्रणेला दहशतवाद्यांचे इरादे नेस्तनाबूत करण्यात यश आले.

दोन गट आणि लष्करी गणवेश
दहशतवाद्यांनी विमानतळाचे सुरक्षा कवच भेदून प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी पाच दहशतवाद्यांचे दोन गट केले होते. त्यांनी लष्करी गणवेश परिधान केलेले होते. त्यांच्याकडे ग्रेनेड्स, रॉकेट लाँचर्स, आत्महत्या करण्याचे साहित्य होते.
मोदींनी घडवला हल्ला : सईद
हा पाकिस्तानवरचा हल्ला आहे. भारताकडून पुकारण्यात आलेल्या या युद्धामागे नरेंद्र मोदी यांचे नवीन सुरक्षा पथक आहे. खरा शत्रू कोण आहे हे देशाला माहीत आहे, असे ट्विट जमात उद दावाचा म्होरक्या हाफिज सईदने केले आहे. भारताशी मैत्रीचे प्रयत्न थांबवा. ही चोख उत्तर देण्याची वेळ आहे, असा सल्ला त्याने दिला आहे.

अतिरेक्यांकडे जखमा बर्‍या करणारे उपकरण
तालिबानी दहशतवाद्यांनी आपल्या कारवायांत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा जोरदार वापर केल्याचे दिसून आले आहे. कराचीतील हल्ल्यात दहशतवाद्यांनी सेकंदात जखम बरी करणार्‍या उपकरणाचा वापर केल्याचे आढळून आले आहे. घटनास्थळी असे यंत्र सापडले आहे. शरीरावरील जखमेतून वाहणारे रक्त काही क्षणांत बंद करून त्वचा पूर्ववत करता येऊ शकते. त्यासाठी केवळ 15 ते 20 सेकंदांचा कालावधी पुरेसा आहे.