आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानची ‘वाटमारी’, नाटोच्या प्रत्येक ट्रकमागे 50 हजारची मागणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - नाटोच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तान-अमेरिका, नाटो यांच्यातील संबंध ताणले असतानाच पाकिस्तानने आपला रोष आता वेगळ्या मार्गाने व्यक्त करण्याचे ठरवले आहे. पाकिस्तानमधून अफगाणिस्तानमध्ये जाण्यासाठी आता नाटोला पैसे मोजावे लागणार आहेत. ट्रकमागे पन्नास हजार रुपयांची मागणी पाकिस्तानने केली आहे.
आपल्या हद्दीतील रस्ता वाहतुकीसाठी आता शुल्काच्या नावाखाली पैसे वसूल करण्याचे ठरवले आहे. नाटोला अफगाणिस्तानातील आपल्या सैनिकांना रसद पुरवायची असेल तर पाकिस्तानची ही अट मान्य करावी लागणार आहे. या संदर्भातील पैसे लष्कराकडे जमा करावे लागणार आहेत. हा प्रस्ताव मूळ राष्ट्रीय रसद सेलने (एनएलसी) तयार केला आहे. वाहतुकीवर शुल्क लावण्याचा हा प्रस्ताव असून त्याला मंजुरी देण्याबाबत पाकिस्तानी सरकार पूर्णपणे सकारात्मक असल्याचे सूत्रांनी सांगितले.यासंदर्भातील अंतिम निर्णय अद्याप होणे बाकी आहे. सध्याही एनएलसी काही प्रमाणात शुल्क घेते. एनओसीसाठी अशा प्रकारचे शुल्क आकारण्यात येत असले तरी ते नाममात्र स्वरूपाचे आहे; परंतु आता प्रत्येक ट्रकमागे 50 हजार 225 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. बलुचिस्तानमार्गे अफगाणिस्तानात जाण्याचा मार्ग नाटोसाठी सोयीचा आहे. त्याचबरोबर तो कमी खर्चाचादेखील आहे. दुसरीकडे या मार्गे 4 हजार मालवाहू ट्रक, 1 हजाराहून अधिक इंधन टँकर ये-जा करतात.
पाकिस्तानने अमेरिकेच्या म्हणण्यानुसार दहशतवाद विरोधातील लढाईत सहभाग घेतला खरा; परंतु त्यात देशाच्या अर्थव्यवस्थेला 68 अब्ज डॉलर्सचा फटका बसल्याचा अहवाल गेल्या वर्षी संसदेत मांडण्यात आला होता. नाटोकडून पैसा वसूल करण्यासाठी सरकारने आणखी एक बहाणा केला आहे. नाटो ट्रकच्या वाहतुकीमुळे सीमेवरील रस्त्यांचे नुकसान झाले आहे.