कराची - व्हीआयपींसाठी विमान उड्डाणाला विलंब करण्याचा प्रकार भारताप्रमाणेच पाकिस्तानातही घडतो. मात्र सोमवारी झालेल्या घटनेत पाकिस्तानच्या प्रवाशांनी लेट लतीफ माजी मंत्री रहमान मलिक आणि एका हिंदू खासदाराला चांगलाच धडा शिकवला. दिरंगाईमुळे संतापलेल्या प्रवाशांनी मलिक यांना विमानात प्रवेशच करू दिला नाही. तसेच विमानात बसलेल्या हिंदू खासदाराला खाली उतरण्यास भाग पाडले.
कराची विमानतळावर सोमवारी रात्री पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे विमान उभे होते. इस्लामाबादला जाणाऱ्या या विमानाच्या उड्डाणाची वेळ निघून गेली तरी विमान जागेवरच होते. एक तास.. दीड तास.. दोन तास.. प्रवासी संतापले. व्हीआयपींसाठी विमान थांबवले असल्याचे कळल्यावर तर नागरिकांचा संताप अनावर झाला. हे व्हीआयपी म्हणजे पाकिस्तानचे माजी गृहमंत्री रहमान मलिक. धडा शिकवण्यासाठी प्रवाशांनी त्यांना विमानात चढूच दिले नाही. एक प्रवासी म्हणाला की, रहमानजी, आता तुम्ही बसने या.’ प्रवाशांचा संताप पाहून मलिक धावतच विमानतळाबाहेर पडले.
मलिक बाहेर गेल्यानंतर विमानात बसलेल्या सत्ताधारी पीएमएल-एन पक्षाचे हिंदू खासदार डॉ. रमेशकुमार यांनाही प्रवाशांनी बाहेर काढले. त्यानंतरच सर्व प्रवाशांनी
आपापली जागा गाठली. त्यानंतर ८.५५ वाजता विमानाने उड्डाण घेतले.
* आता बसने या असे सुनावले!
तांत्रिक बिघाडाची सारवासारव
या घटनेनंतर एअरलाइन्सच्या प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया देताना, तांत्रिक बिघाडामुळे विमानाला दीड तास वलिंब झाल्याचे सांगितले. पीआयए कंपनी व्हीआयपी कल्चरला प्रोत्साहन देत नसल्याचेही ते म्हणाले.
रहमान मलिक यांचे टि्वट
रहमान मलिक यांनीही ट्विट केले की, ‘विमानाला त्यांच्यामुळे नव्हे तर आधीपासूनच वलिंब झाला. साडेसात वाजता उड्डाण घेणाऱ्या विमानाला तांत्रिक बिघाडामुळे साडेआठ वाजले. मात्र यासाठी मी जबाबदार नव्हतो.
प्रसंग व्हायरल, वक्तव्येही लोकप्रिय...
* मलिक साहेब, आता तुम्ही मंत्री नाहीत. असता तरी आम्हाला पर्वा नाही - प्रवासी
* मलिक साहेब, आता जमिनीवर या...’ काही प्रवाशांनी अपशब्दही वापरले.
* सॉरी, मलिक साहेब. २५० प्रवासी नाराज आहेत. तुम्ही येथून निघून गेलात तर चांगले होईल.
- विमान कंपनीचे अधिकारी.