इस्लामाबाद - तालिबानविरोधात पाकिस्तानातील सर्व राजकीय पक्ष एकवटले आहेत. पंतप्रधान नवाज शरीफ यांनी बुधवारी सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली होती. त्यात सर्व राजकीय पक्षांनी तालिबानचा बंदोबस्त करण्यावर चर्चा केली.
बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गुड तालिबान आणि बॅड तालिबान असा काही फरक राहिलेला नाही, असे सांगितले. ते म्हणाले, पाकिस्तान आता तालिबानची पाळेमुळे संपेपर्यंत त्याविरोधात लढणार आहे. या बैठकीला राजकीय पक्षांच्या प्रमुखांसह सरकारचे मंत्री, राज्यपाल आणि राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
पंतप्रधान शरीफ म्हणाले, जो पर्यंत शेवटचा दहशतवादी मारला जात नाही, तोपर्यंत दहशतवादाविरोधातील पाकिस्तानची लढाई चालू राहील. ते म्हणाले, सरकार आणि सर्व राजकीय पक्षांनी हा प्रश्न संपेपर्यंत काम केले पाहिजे. शरीफ यांनी आज दहशतवादाविरोधात लढण्यासाठी रणनीती तयार करण्यासाठी नॅशनल प्लॅन कमिशन स्थापन करण्याची घोषणा केली.