आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी राजकारणातील नवा खेळाडू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत इम्रान खानच्या पाकिस्तान तेहरिक -ए-इन्साफ पक्षाला नॅशनल असेंब्लीत 32 जागा मिळाल्या असून इम्रान खान हे विरोधी पक्ष नेते होण्याची चिन्हे आहेत.गेल्या निवडणुकीत पीटीआयला फक्त दोन जागा मिळाल्या होत्या.

पाकिस्तानी राजकारणात नव्याने उदयास येत असलेले नेतृत्व म्हणून इम्रान खान यांना ओळखले जाते. अनेक वर्षांपासून ते राजकारणात आहेत, पण 2013 च्या निवडणुकीत त्यांचा प्रभाव जास्त प्रमाणात दिसला. एक यशस्वी क्रिकेटपटू ते प्रभावी राजकीय नेता अशी ओळख निर्माण करणार्‍या इम्रानचा जगातील प्रसिद्ध दानशूर व्यक्तींमध्ये समावेश होतो. अनेक ठिकाणी त्यांनी मोठा मदतनिधी दिला असून कॅन्सर हॉस्पिटल उभारले आहे. त्याचप्रमाणे 2008 मध्ये त्यांनी मियांवलीमध्ये नमल कॉलेजची स्थापना केली. विकासासाठी शिक्षण महत्त्वाचे असल्याचे सांगत इम्रान खान यांनी प्रचारात शिक्षणाच्या मुद्दय़ाला प्राधान्य दिले. त्याचा पक्ष सत्तेत आल्यास सरकारी शाळाच्या बजेटमध्ये पाच टक्क्यांनी वाढ करण्याचे आश्वासन इम्रान यांनी दिले आहे.

गेल्या आठवड्यात निवडणूक प्रचार रॅलीत झालेल्या अपघातात जखमी झाल्यानंतर इम्रान यांनी रुग्णालयातून पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला शहरी जनतेने प्रतिसाद दिला. या अपघातानंतर त्यांची लोकप्रियता आणखी वाढल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. पूर्वी देशातील फक्त युवक इम्रानसोबत होते, पण आता देशातील जनतेची सहानुभूती त्यांच्यासोबत आहे. साहजिकच सहानुभूतीच्या लाटेमुळे काही मते त्यांच्या पारड्यात पडली. या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला मिळालेल्या मतांमध्ये सहानुभूतीने मिळालेल्या मतांचा वाटा जास्त आहे. प्यू रिसर्च सेंटरने 2012 मध्ये एक पाहणी केली होती. त्यात 10 पैकी 7 पाकिस्तानी नागरिकांनी इम्रान यांच्या बाजूने आपले मत व्यक्त केले होते.

पाकिस्तानातील नॅशनल असेंब्ली आणि प्रांतिक निवडणुकीत क्रिकेटर इम्रान खानच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. पाकिस्तानी जनतेने त्यांच्या टाइम फॉर चेंज घोषणेला प्रतिसाद देत त्यांना चांगला प्रतिसाद दिला आहे. या निवडणुकीतील कामगिरी पाहता पाकिस्तानच्या राजकीय पटलावर हा नवा खेळाडू काय कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

परिचय
नाव : इम्रान खान नियाझी
जन्म : 25 नोव्हेंबर 1952, लाहोर पंजाब, पाकिस्तान
वडील : इक्रामुल्ला खान नियाझी
शिक्षण : कॅथेड्रल स्कूल,लाहोर
ऑक्सफोर्ड विद्यापीठ,इंग्लंड
रॉयल ग्रामर स्कूल,वॉरचेस्टर इंग्लंड
क्रिकेट
इम्रानने पुढील संघाचे प्रतिनिधित्व केले.

पाकिस्तान क्रिकेट, दाऊद क्लब, लाहोर क्लब, न्यू साउथ वेल्स टीम,ऑक्सफर्ड विद्यापीठ संघ, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स,ससेक्स

फलंदाजी :राइट हँड बॅटिंग, गोलंदाजी : राइट आर्म फास्ट,

राजकारण :
पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ ( 25 एप्रिल 1998ला स्थापना)
मियांवली मतदारसंघातून नॅशनल असेंब्लीमध्ये प्रतिनिधित्व
वैयक्तिक माहिती
पत्नी : जेमीमा खान ( 1995 ते 2004)
मुले : सुलेमान आणि कासिम खान

पुरस्कार
हिलाल ए इम्तियाज
प्राइड ऑफ परफॉर्मन्स
अशियन स्पोर्ट्समन

स्लाईडला क्लिक करुन वाचा, क्रिकेट, राजकारण आणि रोमँटिक इम्रान खानची ओळख.