इस्लामाबाद - पाकिस्तानातील राजकीय तिढा दिवसेंदिवस चिघळत आहे. सोमवारी इम्रान खान व मौलवी कादरी यांचे समर्थक सचिवालय व सरकारी वृत्तवाहिनी पी टीव्ही न्यूज कार्यालयात घुसले. यामुळे पी टीव्हीची प्रसारण सेवा काही काळ खंडित झाली. पाकिस्तानी सुरक्षा रक्षकांनी निदर्शकांना बाहेर काढल्यानेंतर पी टीव्हीची सेवा पूर्ववत सुरू झाली. देशातील अस्थिरतेचे संकट दूर करण्यासाठी लष्करप्रमुखांनी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली.
सोमवारी सकाळी आक्रमक निदर्शकांनी सचिवालय व पी टीव्ही कार्यालयावर हल्लाबोल करत प्रसारण रोखले. सुरक्षा जवानांनी कार्यालय रिकामे करण्याचे आवाहन केल्यानंतर कार्यकर्ते बाहेर पडले. राजकीय तिढा सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ(पीटीआय), ताहिर कादरी यांच्या पाकिस्तान अवामी तहरिक आणि सत्ताधारी पीएमएल-एन सरकारमध्ये मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे.
मियांदादचा पाठिंबा
पाकिस्तान क्रिकेट संघातील कारकीर्दीमध्ये इम्रान खान आणि जावेद मियांदाद यांचे फार मधुर संबंध नव्हते. मात्र, सरकारविरोधी आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेल्या इम्रान खानला सध्या मियांदादचा पाठिंबा मिळाला आहे. इम्रान राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. त्याच्या हेतू व प्रामाणिकपणाला कोणी आव्हान देऊ शकत नाही. देशात बदल घडवणाऱ्या त्याच्या कार्यास
आपला पाठिंबा आहे, असे मियांदादने सांगितले.
भारताकडून चिंता
नवी दिल्ली - पाकिस्तानातील बदलत्या स्थितीवर चिंता व्यक्त करत परराष्ट्र मंत्रालय बारकाईने लक्ष ठेवून असल्याची प्रतिक्रिया सरकारने सोमवारी दिली. पाकिस्तानातील स्थिती चिंताजनक आहे. परराष्ट्र मंत्रालय त्यावर लक्ष ठेवून आहे, असे माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. पाकिस्तानातील घडामोडींवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर जावडेकर बोलत होते.
भारत-पाक गृहमंत्र्यांच्या भेटीचा प्रस्ताव नाही : नेपाळमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या सार्क परिषदेदरम्यान गृहमंत्री राजनाथसिंह व पाकिस्तानी गृहमंत्र्यांच्या भेटीचे कोणतेही नियोजन नसल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. पाकिस्तानने दहशतवाद थांबवल्याशिवाय चर्चा शक्य नाही, असे गृहमंत्रालयाने सांिगतले. राजनाथसिंह १८ व १९ सप्टेंबर रोजी आयोजित सार्क परिषदेत उपस्थित राहण्यासाठी नेपाळला जाणार आहेत.