आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करान्यूयॉर्क - भारताकडून सर्व पातळ्यांवर कितीही जुळवून घेण्याचा प्रयत्न होत असला तरी पाकिस्तानची नकारघंटा काही थांबण्यास तयार नाही. मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये दडून बसलेला नाही. भारताकडे काही माहिती असेल तर त्यांनी द्यावी. मग काय करायचे ते ठरवू , ‘प्रयत्न’ करू, असे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्रमंत्री सरताज अझीझ यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
दाऊदचे भारताला प्रत्यार्पण करण्यात यावे यावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. परंतु तो पाकिस्तानात नाही. सार्क अर्थात दक्षिण आशियाई राष्ट्र संघटनेच्या परराष्ट्र मंत्रीस्तरीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. दाऊद पाकिस्तानात नेमका कोठे दडला आहे याची माहिती असेल तर ती देण्यात यावी. त्यावर आम्ही जरूर विचार करू. त्याला शोधण्याचा प्रयत्न करू, असे सांगून अझीझ यांनी तो दडून बसल्याचा आरोप फेटाळून लावला. दहशतवाद ही सर्वत्र दिसून येणारी समस्या आहे. भारत-पाकिस्तानने एकत्र बसून त्यावर उपाय शोधला पाहिजे, असे अझीझ यांनी सांगितले. हिंसाचारासह अनेक गुन्ह्यांत दाऊद भारताला हवा आहे. 1993 च्या मुंबईतील बाँबस्फोट मालिकेनंतर तो मोस्ट वाँटेड दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्याशिवाय त्यांनी संघटित गुन्हेगारी करून अनेक आर्थिक गैरव्यवहारदेखील केले. दरम्यान, सार्क परिषदेला परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीददेखील उपस्थित होते.
26/ 11 प्रकरणी जबाबदारीसाठी रेटा
पंतप्रधान मनमोहनसिंग व नवाझ शरीफ यांच्यातील बैठक निश्चित झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारत 26 / 11 हल्ल्यास जबाबदार ठरवण्यासाठी रेटा वाढवणार आहे. हल्ल्यात 166 जण ठार झाले होते. त्या घटनेतील जबाबदार घटकाला निश्चित करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव टाकणार आहे. हल्ल्याचा कट करणे, प्रत्यक्षात तो घडवणे अशा दहशतवादी कृत्यामध्ये सामील असलेले आरोपी पाकिस्तानातील तुरुंगात शिक्षा भोगत आहेत किंवा यातील काही आरोपी देशात मोकळे फिरू लागले आहेत, अशी चिंता परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. पाकिस्तानात यासंबंधीच्या खटल्यात नवीन सरकारी वकिलाची नियुक्ती झाली आहे. त्यावर खुर्शीद यांनी समाधान व्यक्त केले.
आजच्या बैठकीकडे लक्ष, एच 1-बी व्हिसाचा मुद्दा मांडणार
मनमोहनसिंग व बराक ओबामा यांच्यात शुक्रवारी द्विपक्षीय बैठक होणार आहे. त्या बैठकीत भारताकडून एच-1 बी व्हिसाचा मुद्दा मांडण्यात येणार आहे. व्हिसा नियमांतील काही तरतुदी भारतीय व्यावसायिकांना आडकाठी निर्माण करणा-या आहेत. त्याबद्दल अमेरिकेला अवगत करण्यात येणार आहे. दरम्यान, पंतप्रधान सिंग यांचे गुरुवारी वॉशिंग्टनमध्ये आगमन झाले. ते शुक्रवारी ओबामांशी चर्चा करतील. कररचना, बंदरविषयक नियम, विमान-दूरसंचार क्षेत्रातील थेट परदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढवणे इत्यादी मुद्द्यांवरदेखील चर्चा होणे अपेक्षित असल्याची माहिती खुर्शीद यांनी दिली. दरम्यान, अमेरिकेतील शीख समुदायाच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट घेतली. अमेरिकी शीख समुदायावरील वाढत्या हल्ल्याचा मुद्दादेखील उभय नेत्यांच्या बैठकीत उपस्थित होणार आहे. त्यामुळे शुक्रवारच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.