आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Stand After Terror Attack On Peshawar Army School

पेशावर हल्ल्याच्या मास्टरमाइंडवर 1 कोटींचा इनाम, 615 अतिरेक्यांना पकडण्याचा पाकचा चंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावर- पाकिस्तानी सरकारने तालिबानींवरील कारवाईत वाढ करतानाच पेशावर हल्ल्याचा मास्टरमाइंड मुल्ला फजलुल्लाह याची माहिती देणा-यास 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. पेशावर हल्ल्यात लहान मुलांसह 150 जणांचा मृत्यू झाला होता.

प्रांत सरकारने 615 अतिरेक्यांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली असून त्यांच्यावर सुमारे ७ कोटी ६० हजार रुपयांचे इनाम ठेवण्यात आले आहे, असे प्रांताचे माहिती मंत्री मुश्ताक घनी यांनी सांगितले. फजलुल्लाह (४०) ऊर्फ रेडिओ मुल्लाह याने पेशावर हल्ल्यादरम्यान हल्लेखोरांशी संपर्क साधला होता, अशी माहिती मिळाली आहे. स्वात खोऱ्यातील तालिबानी कारवायांचा म्होरक्या म्हणून फजलुल्लाह सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. नोव्हेंबर २०१३ मध्ये तो स्वात खोऱ्याचा म्होरक्या झाला. हकिमुल्लाह मेहसूदचा अमेरिकी ड्रोन हल्ल्यात खात्मा झाल्यानंतर फजलुल्लाह म्होरक्या झाला होता. त्या अगोदर ऑगस्ट २००९ मध्ये बैतुल्लाह मेहसूदचा खात्मा झाला होता. लष्कर-ए-इस्लामचा म्होरक्या मांगल बाघ याची माहिती देणाऱ्यांना देखील सुमारे १ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे घनी यांनी जाहीर केले आहे.
२६ / ११ प्रकरण : लख्वीला
पाक कोर्टाचे समन्स
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकी-उर-रहेमान लख्वी याच्या विरोधात पाकिस्तानी कोर्टाने मंगळवारी समन्स जारी केले. २६ / ११ प्रकरणी मिळालेल्या जामिनाला सरकारने आव्हान दिले होते. त्या याचिकेवर न्यायालयाने हे आदेश बजावले. इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय पीठाने हा आदेश दिला. दहशतवाद विरोधी कोर्टाने लख्वीचा जामीन मंजूर केला होता, परंतु तूर्त या खटल्यात लख्वीला पुढील सुनावणीस हजर राहण्याचे आदेश दिले.
नॅशनल असेंब्लीकडून दुरुस्तीला मंजुरी
लष्करी न्यायालय स्थापन करण्यासाठी कायद्यात करण्यात येणाऱ्या दुरुस्तीचे विधेयक नॅशनल असेंब्लीने मंगळवारी स्वीकारले. त्यानुसार दहशतवादी खटल्यांचा जलदगतीने निपटारा करण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे. संसदेच्या कनिष्ठ सभागृहात प्रस्तावाच्या बाजूने २४७ सदस्यांनी आपला कौल दिला. बहुमतामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
अतिरेकीविरोधी कृती आराखडा
पेशावर हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादाविषयीचे धोरण पूर्वीपेक्षा अधिक आक्रमक झाले आहे. त्यानुसार पाकिस्तानी लष्कर आदिवासी भागातील अतिरेकीविरोधी मोहीम तीव्र करणार आहे.
नवाझ शरीफ बहरीन दौ-यावर : पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ मंगळवारपासून बहरीन दौऱ्यावर रवाना झाले. त्यांचा हा दोनदिवसीय दौरा बुधवारपासून सुरू होईल. आर्थिक तसेच राजकीय पातळीवरील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी शरीफ यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो.