इस्लामाबाद - पंतप्रधाननवाझ शरीफ यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अडून असलेले पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान राजकीय पेच सोडवण्याच्या दृष्टीने सरकारशी चर्चेसाठी राजी झाले आहेत. दरम्यान, या पेचातून तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानेही हस्तक्षेप केला असून सर्वच राजकीय पक्षांनी यावर ठोस उपाय सुचवावेत, असे निर्देश न्यायालयाने बुधवारी दिले.
गेल्या दीड महिन्यापासून नवाझ शरीफ सरकारविरोधात आंदोलन करून संसदेवर कूच करणारा माजी क्रिकेटपटू इम्रान खान संसदीय राजकारणात मात्र एकाकी पडला आहे. ताहिर उल कादरी यांचा ‘पाकिस्तान अवामी तेहरिक’ हा पक्ष वगळता संसदेतील इतर सर्व पक्षांनी इम्रानच्या या भूमिकेला विरोध केला आहे. त्यामुळे संसदेत तरी शरीफ यांचे पारडे जड दिसत आहे. जमात-ए-इस्लामीचे नेते सिराज-उल-हक यांनीही चर्चेसाठी आता मार्ग खुला झाल्याचे म्हटले आहे. काही मुद्दे अजूनही वादग्रस्त असले तरी तोडगा निघण्याच्या दृष्टीने ७० टक्के तयारी पूर्ण झाली असल्याचे ते म्हणाले. लवकरच यावर ठोस तोडगा निघून अधिकृत घोषणा केली जाईल, असा दावाही त्यांनी केला. या स्थितीत सरकारने कोणतेही नकारात्मक विधान जाहीररीत्या करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
निदर्शने सुरूच
एकीकडे देशातील राजकीय पेच सोडवण्यासाठी संसद न्यायालयीन स्तरावर प्रयत्न सुरू असले तरी इम्रान खान कादरी समर्थकांची इस्लामाबादेत निदर्शने सुरूच आहेत. पंतप्रधान नवाझ शरीफ पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शरीफ यांचे धाकटे बंधू शहाबाज यांच्या राजीनाम्याची मागणी या दोन्ही नेत्यांनी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत दोन्ही नेत्यांनी राजीनामे दिल्याशिवाय निदर्शने मागे घेतली जाणार नाहीत, असे खान कादरी यांचे म्हणणे आहे.
नुकसानीचा दणका
इम्रान कादरी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा अहवाल न्यायालयात सादर करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणीदरम्यान दिले. निदर्शकांनी संसदेच्या पार्किंग परिसरात बस्तान मांडले आहे. ही जागा त्वरित रिकामी करावी म्हणून न्यायालयाने आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली.
हजारो समर्थक, तेवढेच सुरक्षा जवान
संसदपरिसरात इम्रान खान कादरी समर्थक अजूनही मोठ्या संख्येने उपस्थित असून तेवढ्याच प्रमाणात सुरक्षा जवानही या भागात तैनात करण्यात आले आहेत. ‘डॉन’नुसार पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते माजी गृहमंत्री रहमान मलिक यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेनंतर पाकिस्तान अवामी तेहरिकचे उपाध्यक्ष शहा महमूद कुरेशी यांनी देशात लोकशाही कायम राहावी म्हणून
आपला पक्ष सरकारी प्रतिनिधींशी चर्चेसाठी तयार असल्याचे जाहीर केले.