वृत्तसंस्था
Jul 17,2011 07:15:21 AM ISTइस्लामाबाद: २००९ मध्ये लाहोर येथे श्रीलंका क्रिकेट संघावर हल्ला करणारा पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मलिक इसाक तुरुंगात असताना त्याला पंजाब प्रांत सरकारकडून नियमितपणे मानधन दिले जात होते, अशी खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. इसाक लष्कर-ए-झांगवीचा म्होरक्या असून गुरुवारी त्याची जामिनावर सुटका झाली आहे.
पाकिस्तानी दैनिक ‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’ने हा गौप्यस्फोट केला आहे. पंजाब प्रांतात नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तानी मुस्लिम लीग (पीएमएल-एन) पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यापासून म्हणजे २००८ पासून इसाकला मानधन देण्यात येते. विशेष म्हणजे त्याआधीपासूनच तो तुरुंगात होता. पंजाब प्रांताचे कायदामंत्री राणा सनाउल्लाह यांनीही इसाकला मानधन सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. ही रक्कम त्याला न्यायालयाच्या आदेशावरून त्याच्या कु टुंबीयांना दिली जाते, असा दावा राणांनी केला. ‘एक्स्प्रेस ट्रिब्यून’ने शोध केला असता मानधन देण्याचे न्यायालयाचे आदेशच नव्हते तसेच लष्करशहा परवेझ मुशर्रफांच्या काळातही हे मानधन दिले जात नव्हते, असे निदर्शनास आले. दरम्यान, गुरुवारीच सर्वोच्च न्यायालयात इसाकला जामीन मिळाला असून कोट लखपत तुरुंगातून त्याची सुटका झाली आहे.