आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan To Ban 12 Terrorist Organization\'s Including Jamat Ud Dawa:Source

अमेरिकेने आवळल्या पाकच्या मुसक्या, जमात उद दावासह 12 संघटनांवर बंदीची तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तान सरकारने हाफीज सईदच्या जमात उद दावा सह इतर 12 दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याची तयारी सुरू केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने पाकिस्तानवर दबाव आणल्याने पाकिस्तानने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे जॉन केरी यांनी मंगळवारीच पाकिस्तानला दहशतवादाविरोधी नरमाईची भूमिका घेऊ नये असा इशारा दिला होता. पाकिस्तानच्या काही माध्यमांनी यासंदर्भात वृत्त दिले आहे.

ओबामांच्या भारत दौ-याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला आणखी मदत देण्याचा निर्णय अमेरिकेकडून घेतला जाणार होता. पण भारताकडून मोठ्या प्रमाणावर आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे तसे झाले नाही. तसेच पाकिस्तानने दहशतवादाविरोधी सक्तीची भूमिका घ्यावी असेही पाकिस्तानला वारंवार सांगण्यात आले. त्याच पाकिस्तानच्या दौ-यावर असलेले अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनीही मंगळवारी शरीफ यांच्याबरोबर झालेल्या द्विपक्षीय चर्चेमध्ये पाकिस्तानला खडे बोल सुनावल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे अमेरिकेच्या दबावामुळेच पाकिस्तानने जमात उद दावासह, हक्कानी नेटवर्क सारख्या एकूण 12 संघटनांवर बंदी लादण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत निर्णय झाल्याची माहिती नसून अंतिम यादीही समोर आलेली नाही.

पेशावर हल्ल्यानंतर निर्णय!
पेशावर येथील आर्मी स्कूलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सुमारे दीडशे निरागस बालकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पाकिस्तानने दहशतवादाविरोधातील मोहीम सुरू राहणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. या हल्ल्यानंतर जगभरातून हळहळ व्यक्त होत होती. त्याचप्रमाणे पाकिस्तानातील समाजही हादरून गेला होता. त्यामुळे पाकिस्तानातील जनतेचाही अशा प्रकारच्या कारवाईसाठी दबाव होता हे नाकारता येणार नसल्याचे पाकिस्तानातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अमेरिकेचा दबाव गेल्या अनेक दिवसांपासून होता, त्याचप्रमाणे भारताचाही दबाव मोठ्या प्रमाणावर होता. पण पेशावर हल्ल्यानंतर पाकिस्तानला झालेले दुःख मोठे होते. त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.