आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इस्लामाबाद- मुंबईवर 2008 मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यासंदर्भात भारताने दिलेले पुरावे पाकिस्तानी न्यायालयात ग्राह्य धरले जाऊ शकत नाहीत, असे पाकिस्तानने भारताला कळवून टाकले आहे. त्यामुळे मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्यांविरुद्ध कारवाई करण्याचे पाक करत असलेले ढोंग पुन्हा एकदा उघडे पडले आहे.
मार्चमध्ये पाकिस्तान न्यायिक आयोगाच्या भारत दौ-यात भारतीय अधिका-यांची उलटतपासणी करू देण्यात आली नसल्यामुळे मुंबई हल्ला प्रकरणी लष्कर-ए-तोएबाचा कमांडर झकिउर रहमान लखवींसह अन्य सात जणांविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यात भारताने दिलेले पुरावे पाकिस्तानी न्यायालयात स्वीकारार्ह ठरू शकत नसल्याचे अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने नवी दिल्लीला कळवले आहे. भारत सरकारला मंगळवारी पाठवलेल्या पत्रात पाकच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने रावळपिंडीच्या दहशतवादविरोधी न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला दिला आहे. पाकिस्तानी न्यायालयात भारतीय पुरावे ग्राह्य ठरण्यासाठी महत्त्वाच्या भारतीय अधिका-यांची उलटतपासणी होणे आवश्यक असल्याचे रावळपिंडी न्यायालयाने म्हटले आहे. 28 जुलै रोजी झालेल्या सुनावणीत भारताने दिलेले पुरावे दाखल करण्यासाठी हजर झालेल्या पाकिस्तानी तपास अधिका-यांचा जबाब रावळपिंडी न्यायालयाने नोंदवून घेतला नाही. पाकिस्तानी न्यायिक आयोगाला दिलेल्या पुराव्यात या हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाबचा कबुलीजबाब, हल्लेखोर आणि पाकिस्तानातील त्यांचे हॅण्डलर यांच्यात झालेल्या संभाषणाची सीडी, मृत अतिरेक्यांचे वैद्यकीय व शवविच्छेदन अहवाल आणि चार भारतीय अधिका-यांचे जबाब यांचा समावेश आहे. पाकच्या न्यायिक आयोगाने या चारही अधिका-यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. मात्र त्यांची उलटतपासणी करण्याची परवानगी भारताने दिली नाही. पाकिस्तानी न्यायालयात सात आरोपींविरुद्धच्या खटल्यात युक्तिवाद करणा-या वकिलाकडून भारतीय अधिका-यांची उलटतपासणी झाल्याशिवाय दिलेल्या पुराव्यांना पाकिस्तानी न्यायालयात कायदेशीरदृष्ट्या काहीही महत्त्व नसल्याचे पाकच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने भारताला कळवले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.