आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएसआयवर अंकुश ! गुप्तहेर संस्थेवरील नियंत्रणाचे पाकिस्तानी सिनेटमध्ये विधेयक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आयएसआयला लवकरच कायद्याने वेसण घातली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्षांच्या दबावानंतर या सर्वाेच्च संस्थेवर नियंत्रण आणणाºया विधेयकाचा प्रस्ताव सिनेटमध्ये मांडण्यात आला आहे. त्यानुसार आयएसआयचे संसदेप्रती उत्तरदायित्व राहील, अशी यात तरतूद करण्यात आली आहे.
संसदेच्या वरिष्ठ सभागृहात विधेयक मांडण्यात आले असून हा 19 पानांचा दस्तऐवज आहे. फरहातुल्लाह बाबर यांनी हा प्रस्ताव सादर केला आहे. बाबर हे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांचे प्रवक्ते आहेत. त्यांनीच काही दिवसांपूर्वी हा प्रस्ताव सादर केला होता. सोमवारपासून सुरू झालेल्या अधिवेशनात त्यावर चर्चा होणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले. सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या सूत्रांनी ‘डॉन’ वृत्तपत्राला ही माहिती दिली. प्रस्तावित गुप्तहेर संस्था कायदा 2012 च्या मसुद्यात आयएसआय संसदेला जबाबदार राहील. संसदेच्या नियंत्रणाखाली आयएसआयला काम करावे लागणार आहे. संसद व पंतप्रधान हे आयएसआयसाठी सर्वाेच्च राहतील. यामुळे संस्थेमध्ये जबाबदारीचे भान निर्माण होईल. त्याचबरोबर शिस्त दिसून येईल. राजकीय पुढाºयांना लक्ष्य करण्याचे प्रमाण कमी होईल, असे सरकारला वाटते. त्यानुसार मसुद्यात शिफारशी करण्यात आल्या आहेत.
आयएसआयच्या कारवायांबाबत अनेक तक्रारी व टीका झाल्यानंतर पहिल्यांदाच या दिशेने गांभीर्याने प्रयत्न केले जात आहेत. गेल्या वर्षी अमेरिकेने अबोटाबादमध्ये केलेल्या कारवाईत ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यात आला होता. त्यानंतर पाकिस्तानवर जोरदार टीका झाली होती.
सरकारने खरोखरच यासाठी प्रयत्न केले तर सर्व राजकीय पक्ष त्याचे समर्थन करतील. पाकिस्तानी मुस्लिम लीग (नवाज शरीफ) सारखा पक्षही त्याला अपवाद राहणार नाही, अशी अपेक्षा सर्वाेच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश तारिक महमूद यांनी व्यक्त केली.
लादेन लपल्याची मुशर्रफना कल्पना आयएसआयच्या माजी प्रमुखांची कबुली
मेलबर्न- लष्कर-ए-तोएबाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन पाकिस्तानात दडून बसल्याची माहिती तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना होती. पाकिस्तानी लष्कराच्या एका ब्रिगेडियरनेच लादेनला आश्रय दिला होता, असा खळबळजनक दावा पाकिस्तानाच्या आयएसआयच्या माजी प्रमुखाने दिली आहे.
एजाज शाह असे या ब्रिगेडियरचे नाव असून एजाज हे मुशर्रफ यांच्या निकटवर्तीयांपैकी असल्याचा दावा आयएसआयचे माजी प्रमुख जनरल झियाउद्दीन बट यांनी केला आहे. बट एका टीव्ही मुलाखतीत बोलत होते. एजाजनेच लादेनला अबोटाबादमध्ये प्रशस्त घरात लपवले असे मला वाटते, असे बट म्हणाल्याचे वृत्त सिडनी मॉर्निंग हेरॉल्ड या वृत्तपत्रात प्रकाशित झाले आहे.
एजाज हे मुशर्रफ यांच्या काळात गुप्तहेर यंत्रणेच्या प्रमुखपदावर होते. एजाज यांचे गुन्हेगारी विश्वाशी वर्षानुवर्षांचे संबंध होते. त्याचबरोबर लष्करालाही ते जवळून ओळखत होते, असा दावा बट यांनी केला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी 2 मे रोजी अबोटाबाद येथील घरावर कारवाई झाली होती. या घराला कुंपण बांधण्याचे आदेशदेखील एजाज यांनी दिले होते. एजाज यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा आढळून आलेला नाही. दुसरीकडे बेनझीर भुट्टो यांच्या हत्येनंतर एजाज यांनी पाकिस्तान सोडून आॅस्ट्रेलिया गाठले.