आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी लष्कर मुशर्रफांच्या पाठीशी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - न्यायपालिका आणि वकिलांनी माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफांचा आणखी अवमान केल्यास पाकिस्तानी लष्कर हस्तक्षेप करू शकते, असा इशारा अनेक निवृत्त लष्करी अधिका-यांनी दिला आहे. मुशर्रफांना कोर्टकज्जात अडकवण्यासाठी काही विशिष्ट लोक वकिलांना फूस लावत आहेत, असा लष्करी अधिका-यांना वाटते.
पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये माजी लष्करशहा मुशर्रफांच्या अटकनाट्याबद्दल निवृत्त लष्करी अधिकारी, सुरक्षाविषयक तज्ज्ञांची मते आली आहेत. पाकिस्तान आपली वाट पाहत आहे, असा सोशल मीडियावर फसवा प्रचार करून काही विशिष्ट लोकांनी मुशर्रफांना पद्धतशीरपणे जाळ्यात अडकवले. अन्यथा देशावर दहा वर्षे राज्य करणा-या माजी लष्करप्रमुखाला अपमानित करण्याची वकिलांची हिंमत झाली नसती, असे मत निवृत्त लष्करप्रमुख मिर्झा असलम बेग यांनी व्यक्त केले आहे.


मुशर्रफांच्या कार्यकाळात पदोन्नत झालेल्या किमान नऊ कॉर्प्स कमांडर्सचा मुशर्रफांना पाठिंबा आहे. त्यामुळे लष्कर या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. मुशर्रफांचा मानहानीपासून बचाव करण्यासाठी विद्यमान लष्करप्रमुख जनरल अश्फाक कयानी हेसुद्धा मुशर्रफांच्या मदतीला धावून येण्याची शक्यता असल्याचे मत पाकिस्तानचे निवृत्त जनरल व संरक्षणतज्ज्ञ जमशेद अयाझ यांना वाटते, तर वकील कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप निवृत्त लष्करी अधिकारी सोसायटीचे अध्यक्ष निवृत्त जनरल फैझ अली चिश्ती
यांनी केला.


अधिका-यांमध्येही फूट
निवृत्त लष्करी अधिकारी संघटनेचे प्रतिनिधी ब्रिगेडियर मियाँ मोहंमद मेहमूद यांनी मात्र मुशर्रफांना निवृत्त अधिका-यांची सहानुभूती नसल्याचे ठामपणे सांगितले. सन 2007 मध्ये त्यांनी जे पेरले त्याचीच फळे आता ते भोगत आहेत, अशी टीका मेहमूद यांनी केली.


लष्कराचा सल्ला धुडकावला
पाकिस्तानात परत येऊ नका असा सल्ला लष्कराने दिला होता, परंतु मुशर्रफांनी त्याकडे दुर्लक्ष केले. लष्कर त्यांच्या मदतीला धावून जाणार नाही. कारण लष्कराचीच प्रतिमा बिघडणार आहे, असे मत संरक्षणतज्ज्ञ आयेशा सिद्दिकी तसेच स्तंभलेखक इम्तियाज गुल यांनी व्यक्त केले आहे. छुपा अजेंडा असलेले काही वकील माजी लष्करशहा मुशर्रफांची मानहानी करून संपूर्ण वकील जमातीलाच बदनाम करीत आहेत, असा आरोप पाकिस्तानी बार कौन्सिलचे उपाध्यक्ष सय्यद कालबे हसन यांनी केला. खटला न लढवताच त्यांनी पुन्हा पाकिस्तान सोडावे यासाठी मुशर्रफांवर दडपण आणले जात आहे, असे हसन म्हणाले.

बेनझीर हत्येप्रकरणी मुशर्रफ कोर्टात; बाहेर वकिलांची निदर्शने
रावळपिंडी - पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांना मंगळवारी सकाळी इस्लामाबादेतील फार्महाऊसमधून रावळपिंडी येथे आणून दहशतवाद प्रतिबंधक न्यायालयात उभे करण्यात आले. बेनझीर भुत्तो हत्याकांड प्रकरणात त्यांची सुनावणी होती. मुशर्रफ यांना याच न्यायालयाने फरार घोषित केले होते. हा खटला 2008 मध्ये सुरू झाला होता. न्यायाधीश चौधरी हबीबुर्रहमान यांनी बंद खोलीत सुनावणी घेतली. प्रकरणाच्या तपासात सहकार्य करण्याचे आदेश त्यांनी मुशर्रफ यांना दिले आणि नंतर 3 मेपर्यंत सुनावणी पुढे ढकलली. मुशर्रफ यांच्यावर आरोप आहे की, 2007 मध्ये ते राष्टÑप्रमुखपदी असताना माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांना पुरेसे संरक्षण उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे भुत्तो यांची हत्या झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाबाहेर हजारो वकिलांनी मुशर्रफ यांच्याविरुद्ध घोषणा दिल्या आणि निदर्शने केली.