इस्लामाबाद - रविवारी ( ता. सहा) नासीर- उल- मुल्क यांनी पाकिस्तानचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. मुल्क सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. मुख्य न्यायाधीशपदावरून तसादक हुसेन यांच्या निवृतीनंतर मुल्क यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मुख्य न्यायाधीश इफ्तीकार मोहम्मद चौधरी यांच्या कालखंडात न्यायमंडळ राजकीय दृष्ट्या सक्रिय होते. चौधरींनी लष्करशहा मुशर्रफ आणि माजी पंतप्रधान गिलानी यांच्याबाबत कठोर असे निर्णय घेतले होते.
मुल्क यांना मुख्य न्यायाधीशपदाची शपथ पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष ममनून हुसेन यांनी दिली. यावेळी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि मंत्रिमंडळाचे सदस्य उपस्थित होते. न्यायमंडळ न्यायाचे वैयक्तिक आकलनास परवानगी देत नाही, असे मुख्य न्यायाधीश मुल्क यांनी आपल्या भाषणात सांगितले.