आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुशर्रफांचा विजनवास संपला; चार वर्षांनंतर पाकिस्तानात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची - तालिबानने दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे अखेर रविवारी मायदेशी आगमन झाले. चार वर्षांनंतर परतलेले मुशर्रफ येथे चार्टर्ड विमानाने दाखल झाले. सुरक्षेच्या कारणावरून कराचीतील सभा रद्द करण्यात आली आहे.
दुबईहून संयुक्त अरब अमिरातीच्या विशेष विमानाने मुशर्रफ पाकिस्तानातील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. तेथून त्यांना थेट नियोजित ठिकाणी नेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरक्षेच्या कारणावरून हा निर्णय घेण्यात आला. मुशर्रफ यांच्या आगमनानंतर एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, परंतु स्थानिक प्रशासनाने त्यास परवानगी नाकारली. मोहंमद अली जिना यांच्या कबरीजवळ ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीसाठी आवश्यक असणारे एनओसी मागे घेण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणावरून हा निर्णय घेण्यात आल्याचे सिंध पोलिस विभागाचे प्रवक्ते इम्रान शौकत यांनी सांगितले.यासंदर्भात पोलिसांनी मुशर्रफ यांचा पक्ष ऑल पाकिस्तान मुस्लिम लीगला तसे कळवले आहे. एपीएमएलने ही बैठक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

दुबईहून निघताना ट्विट
कराचीत मी 24 मार्च रोजी दुपारी 1 च्या सुमारास दाखल होईल. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता सभेला हजेरी लावेल, असे मुशर्रफ यांनी ट्विटरवर सांगितले होते.

फोटोही पोस्ट
दुबईतील घर सोडताना त्यांनी एक फोटो काढला. तो फोटोही त्यांनी स्वत: ही पोस्ट केला आहे. फोटोत मुशर्रफ यांनी पांढर्‍या रंगातील सलवार खमीज परिधान केल्याचे दिसते. त्यानंतर त्यांनी आणखी एक फोटो पाठवला. मायदेशी परतताना विमानातील आसनावर बसलेले मुशर्रफ त्यात दिसतात.

भीती कसली, जनतेसाठी आलो
जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे. काही लोक भीती घालण्याचा प्रयत्न करत आहेत, पण मला त्याची भीती वाटत नाही. माझा देश, जनता यांच्यासाठी मी परततोय, अशी प्रतिक्रिया मुशर्रफ यांनी दिली आहे. त्यांच्यासोबत
पत्रकारांसह एकूण 150 लोकांचा जथा रविवारी पाकिस्तानात दाखल झाला आहे. त्यांच्या आगमनानंतर विमानतळावर समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.

कधी सोडला मायदेश
2009 मध्ये परवेझ मुशर्रफ यांना पाकिस्तान सोडून जावे लागले होते. मुशर्रफ यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल झाले होते. त्यासंबंधीचे खटलेही न्यायालयात सुरू असल्याने ते सत्तेवरून पायउतार होताच परदेशात गेले होते. त्यांनी देशात येऊ नये अन्यथा नरकात पाठवू, अशी धमकी तेहरिक-ए-तालिबानने दिली होती.