तैपेइ (तैवान)- विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर नियंत्रण गमावून बसलेले तैवानी प्रवासी विमान उड्डाणपूलाला चाटत जात तैपेइमधील एका नदीत कोसळले. या दुर्घटनेत 19 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 24 प्रवासी अद्याप बेपत्ता आहेत. 15 प्रवाशांना वाचवण्यात यश आले असल्याचे तैवानी मीडियाने सांगितले आहे.
तैवानच्या मीडियाने विमान कोसळल्याची छायाचित्रे प्रकाशित केली आहेत. तैपेइमधील कीलुंग नदीच्या किनाऱ्यापासून सुमारे 100 मीटर आत पाण्यात विमान कोसळले आहे. त्यापूर्वी काही इमारतींना आणि उड्डाणपुलाला चुकत विमान गेले. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर या दुर्घटनेची गंभीरता जगासमोर आली. एका कारच्या डॅशबोर्डवर लागलेल्या कॅमेऱ्यात याचा व्हिडिओ कॅप्चर झाला आहे.
तैपेइमधील विमानतळावरुन स्थानिक वेळेनुसार आज सकाळी 10.55 वाजता विमानाने उड्डाण केले होते. किनमेन येथील आयलॅंडवर हे विमान जात होते. उड्डाणानंतर लगेच वैमानिकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर विमान हवेतच गट्यांगळ्या खाऊ लागले. एका उड्डाणपुलालाही विमानाने निसटसा धक्का दिला. यावेळी विमानाचे एक पंख उड्डाणपुलाला आणि त्यावरुन जात असलेल्या एका वाहनाला घासत गेले. त्यानंतर ते नदीत कोसळले.
घटनेची माहिती मिळाल्यावर बचाव दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विमानाचे दार उघडत जखमी प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना अॅम्ब्युलंसच्या माध्यमातून रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकूण 15 प्रवाशांना वाचवण्यात यश आले असून 24 प्रवासी अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे बचाव अभियान अद्याप सुरु आहे.
पुढील स्लाईडवर बघा, तैपेइतील नदीत कोसळलेल्या विमानाची छायाचित्रे....अखेरच्या स्लाईडवर बघा विमान कोसळतानाचा हृदयाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ...