आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ओपीसीडब्ल्यू’ला शांततेचे नोबेल, शस्त्रास्त्रांचा नायनाट करण्याच्या कार्याचा सन्मान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओस्लो - यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार रासायनिक शस्त्रास्त्रांवर नजर ठेवणा-या ऑर्गनायझेशन फॉर प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स (ओपीसीडब्ल्यू) या संस्थेला जाहीर झाला आहे. पाकिस्तानची मलाला युसूफझाई वा रशियाचे राष्‍ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना हा सन्मान मिळण्याची शक्यता व्यक्त होत होती.


नोबेल पुरस्कार समितीचे प्रमुख थोरब्योर्न जगलँड यांनी ही चकित करणारी घोषणा केली. ओपीसीडब्ल्यू पुरस्कारांच्या शर्यतीत नसल्याचे समजले जात होते. सलग दुस-यांदा एखाद्या संस्थेला हा पुरस्कार मिळाला आहे.
गेल्या वर्षी युरोपीयन युनियन तर 2009 मध्ये अमेरिकी राष्‍ट्रपती बराक ओबामांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.


नोबेल समितीने सांगितले की, आंतरराष्ट्रीय समझोत्यांसह ओपीसीडब्ल्यूच्या प्रयत्नांमुळे आंतरराष्‍ट्रीय कायद्यांन्वये रासायनिक शस्त्रास्त्रांच्या वापराला आळा बसला आहे. ही संस्था सध्या सिरीयात रासायनिक शस्त्रांस्त्रांचा हुडकून ती नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. महान वैज्ञानिक अल्फे्रड नोबेल यांचाही निशस्त्रीकरणावर भर होता. डायनामाइटचा आविष्कार करणा-या नोबेल यांच्या नावानेच हा पुरस्कार दिला जातो.


नोबेल शांतता पुरस्कार :
- 1979 मध्ये मदर तेरेसांना प्रदान
- महात्मा गांधीजींना अनेकदा नामांकन मिळाले, मात्र 1948 मध्ये त्यांचे निधन झाल्यामुळे पुरस्कार दिला जाऊ शकला नाही.
- व्हिएतनामचे ली डक हे सन्मान धुडकावणारे एकमेव व्यक्ती आहेत.
- 1901 पासून सुरू झालेला हा पुरस्कार आतापर्यंत 94 वेळा दिला गेला आहे.
- 19 वेळा तो कुणालाही मिळाला नाही.
- आतापर्यंत तो 100 व्यक्ती व 22 संस्थांना मिळाला आहे.
- इंटरनॅशनल रेडक्रॉसला तीन वेळा, तर संयुक्त राष्‍ट्रनिर्वासित उच्चायोगाला दोनला हा पुरस्कार मिळाला.
- 15 वेळा महिलांना मिळाला पुरस्कार.
- तवक्कोल करमन (32) यांना तो सर्वात कमी वयात 2011 मध्ये मिळाला.
- 1995 मध्ये पुरस्कार मिळवणारे जोसेफ रॉटब्लॅट (87) हे सर्वाधिक वयोवृद्ध आहेत.
- तुरुंगात असताना सन्मान मिळवणा-या तीनच व्यक्ती आहेत. यात म्यानमारच्या आंग सान स्यू की, चीनचे मानवाधिकार कार्यकर्ता लियू शियाबाओ व जर्मन पत्रकार कार्ल फॉन ओसित्स्की यांचा समावेश आहे.


आतापर्यंत 57,000 टन शस्त्रास्त्रे केली नष्ट
जगभरातील रासायनिक शस्त्रास्त्रांचा नायनाट करण्याच्या उद्देशाने 1997 मध्ये ओपीसीडब्ल्यूची स्थापना झाली. हेग शहरात मुख्यालय असलेल्या या संस्थेला संयुक्त राष्‍ट्राचे सहकार्य आहे. सध्या 189 देश तिचे सदस्य आहेत. संस्थेने गेल्या 16 वर्षांत 57 हजार टनांपेक्षा अधिक रासायनिक शस्त्रास्त्रे नष्ट केली आहेत. यातील बहुतेक शस्त्रास्त्रे शीतयुद्धादरम्यान रशिया व अमेरिकेकडून सोडली गेली होती.