आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक निवडणुकीवर आता सट्टेबाजी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - आतापर्यंत क्रिकेटवरील सट्टा नेहमीच ऐकण्यात येत होता; परंतु पाकिस्तानात सध्या आगामी निवडणुकीवरील बेटिंगला सुरुवात झाली आहे. रावळपिंडीतील बुकींसह अनेक जणांनी काळ्या पैशांची मोठी उलाढाल करण्यासाठी फिल्डिंग लावल्याचे सांगण्यात येते.
पुढील महिन्यात होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीवर बुकींचा डोळा आहे. त्यामुळे निवडणुकीतील महत्त्वाचे मतदारसंघ, उमेदवार यांच्यावर सट्टा लावला जात आहे. कोण उमेदवार विजयी होणार, याची आतापासूनच आर्थिक गणिते मांडली जात आहेत. पहिल्या टप्प्यात लोक राजकीय पक्षांकडून निवडण्यात येणार्‍या संभाव्य उमेदवारांवर पैसा लावू लागले आहेत. देशात ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत नक्की काय होईल, कोणत्या उमेदवाराला तिकीट मिळेल, मतदारसंघ कोणता असेल, याविषयी प्रचंड अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्याचा फायदा बुकींना होणार आहे. नॅशनल असेंब्लीसाठी रावळपिंडी भागात 55 वा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात कोणता उमेदवार उभा करावा, याविषयी पाकिस्तान पीपल्स पार्टी संभ्रमात आहे. पक्षाला योग्य उमेदवार मिळालेला नाही. त्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी दिली जाईल, यावर हाती चौक, राजा बाजार, मुखा सिंग इस्टेट, मोहनपुरा, रट्टा अमराल भागातील सट्टेबाज उलाढालीसाठी पुढे सरसावले आहेत. पीपीपीच्या उमेदवाराला फारसा भाव नाही. 100 ते 130 रुपये असा भाव सुरू आहे, असे एका पंटरने सांगितले.

मुशर्रफांमुळे संधी
माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ गेल्या आठवड्यात मायदेशी परतले. त्यामुळे निवडणुकीत आणखी रंगत येणार आहे. या गोष्टीमुळे बुकींना व्यवसायाची नामी संधी हाती आली आहे. मुशर्रफांना पाकिस्तान सरकार देशात येण्याची परवानगी देणार नाही, अशी अपेक्षा ठेवून अनेक लोकांनी हजारो रुपयांचा सट्टा खेळला.
सर्वांत व्यग्र दिवस
सध्या मी खूप व्यग्र आहे. कदाचित वर्षातील सर्वाधिक बिझी दिवस असण्याचा हा काळ असावा. निवडणुकीवरील बेटिंगसाठी येणार्‍या कॉलमुळे माझ्या सेलची बेल सतत वाजू लागली आहे. मला बहुधा नवीन सरकार येईपर्यंत उसंत मिळणार नाही. - यासीर मेहमूद, बुकी.