आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People Dividing Into 'Tribes' On Twitter, Facebook

ट्विटर, फेसबुकवर होत आहे ‘आदिम’ समुदायांत विभागणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ट्विटर आणि फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर नवीन प्रवृत्ती रुजू लागली असून लोक स्वत:ची वैशिष्ट्यपूर्ण भाषा असलेल्या ‘आदिम’ समुदायांची स्थापना करू लागले आहेत. समान चरित्र, समान व्यवसाय, समान अभिरुची असलेल्या लोकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या या समुदायांची स्वत:ची अशी वैशिष्ट्यपूर्ण भाषाही असल्याचे रॉयल हॅलोवे विद्यापीठाच्या संशोधकांनी प्रिन्सटन विद्यापीठाच्या सहकार्याने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.

एखादी व्यक्ती फेसबुक आणि ट्विटवर ज्या पद्धतीची भाषा वापरते त्यावरून तो किंवा ती कोणत्या समुदायाशी संबंधित असू शकते, याबाबतचा 80 टक्के अचूक अंदाज बांधता येतो, असे रॉयल हॅलोवे विद्यापीठाच्या जीवविज्ञान स्कूलचे डॉ. जॉन ब्रायडन यांनी म्हटले आहे.

एखाद्या समुदायाकडून मोठ्या प्रमाणात परंतु अन्य युजर्सकडून कधीतरी वापरल्या जात असलेल्या शब्दांचा आम्ही शोध घेतला. एक समुदाय सातत्याने जस्टीन बीबरचा उल्लेख करतो, तर अन्य समुदाय राष्ट्रपती बराक ओबामांबाबत सातत्याने चर्चा करतो, असे ब्रायडन यांनी ईपीजे डाटा सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात म्हटले आहे.

लहेजा आणि लकबही भिन्न
विशेष म्हणजे फेसबुक आणि ट्विटर वापरणार्‍या लोकांचा भिन्न भाषिक लहेजा आणि लकब असली तरी सोशल नेटवर्किंगवरील काही समुदाय विविध शब्दांचा मुद्दामहून अपभ्रंश करत असल्याचेही संशोधकांना आढळून आले आहे. उदा. जस्टीन बायबरच्या चाहत्यांना शब्दांचा शेवट 'ee' ने करण्याची सवय आहे. म्हणजेच ते 'please' हा शब्द मुद्दामहून 'pleasee' असाच लिहितात, तर शालेय शिक्षक हेतूत: लांबलचक शब्दांचा वापर करतात, असे रॉयल हॅलोवेचे प्राध्यापक विन्सेंट जन्सेन यांनी म्हटले आहे.

नव्या सामाजिक ध्रुवीकरणाची नांदी
फेसबुक किंवा ट्विटरवर एकत्र आलेल्या समान अभिरुची आणि समान आवडी-निवडीच्या सदस्यांमध्ये वापरली जाणारी भाषा अन्य समुदायांच्या सदस्यांच्या सहजासहजी लक्षात येत नाही. दुर्गम भागात वास्तव्य करणार्‍या एखाद्या आदिम समुदायाची भाषा आणि प्रतीके जशी अन्य समुदायांच्या लक्षात येत नाहीत, तद्वतच सोशल नेटवर्किंग साइट्सवर अस्तित्वात येत असलेल्या समुदायांची भाषा आणि प्रतीके अन्य समुदायाला समजत नाहीत. ऑनलाइन समुदायात होत असलेली ही विभागणी नव्या सामाजिक ध्रुवीकरणाची नांदी असल्याचे संशोधकांना वाटते.