इस्लामाबाद - पेशावरमधील दहशतवादी हल्ल्याच्या प्रतिक्रिया जगभरातील मीडियातून उमटल्या आहेत. पाकिस्तानातील आघाडीच्या उर्दू दैनिकांनी ‘अतिरेकी आणि त्यांच्या पाठीराख्यांना थांबवण्याची वेळ’ आली असल्याचे मत प्रकर्षाने व्यक्त केले आहे.
देशातील आघाडीच्या उर्दू ‘डेली एक्स्प्रेस’ने अतिशय तटस्थपणे या घटनेचे विश्लेषण केले आहे. अतिरेक्यांच्या विरोधातील लष्करी मोहिमेचा योग्य त्या पद्धतीने शेवट झालाच पाहिजे. अतिरेकी आणि त्यांच्या पाठीराख्यांना रोखण्यासाठी मागे-पुढे पाहता कामा नये. वेळ पडल्यास कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. अशा वेळी देशाची सुरक्षा महत्त्वाची मानून पावले उचलली पाहिजेत, असे वृत्तपत्राचे आग्रही म्हणणे आहे. ‘नवा-इ-वक्त’ने देशातील पुढा-यांना स्वार्थी राजकारण आणि मतभेद सोडून एकजुटीने राष्ट्रहितासाठी लढण्याचे आवाहन केले आहे. सर्व नेत्यांनी एकत्र येऊन दहशतवाद्यांशी लढले पाहिजे, अशी भूमिका वृत्तपत्राने मांडली आहे. त्याचबरोबर पेशावरमधील घटनेत नशीब बलवत्तर म्हणून वाचलेल्या मुलांच्या तोंडून दहशतवादाच्या भयंकर चेह-याची ह
किकतही वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, ‘द डॉन’, ‘द टाइम्स’सह जवळपास सर्वच राष्ट्रीय इंग्रजी दैनिकांच्या संपादकीयामध्ये पेशावरमधील घटना राष्ट्रीय शोकांतिका आहे. मंगळवारचा दिवस देशाच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस असल्याचे मत व्यक्त केले.
मीडियाकडून कानपिचक्या
‘जंग’ वेधक : देशातील आघाडीचे उर्दू दैनिक ‘जंग’च्या पानोपानी रक्तलांछित घटनेची छायाचित्रे दिसून येतात. त्यात घटनेतील मृतांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. त्याशिवाय डेली मशरिक, डेली खबरें, डेली उम्मतच्या ऑनलाइन आवृत्तीत भ्याड कृत्त्याचा धिक्कार करतानाच देशात वाढत चाललेल्या हिंसाचाराला आळा घालण्याची वेळ आल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. अनेक दैनिकांनी वर्षानुवर्षे सरकारच्या चुकीच्या धोरणालाच या घटनेसाठी जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. ‘मशरिक’ने मुख्य पानावर खात्मा झालेल्या तीन दहशतवाद्यांचे फोटो दिले आहेत.