आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करान्यूयॉर्क- विरोधी पक्षाकडून विरोध होत असतानाही पंतप्रधान मनमोहन सिंग रविवारी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी चर्चा करतील. सिंग या बैठकीत शरीफ यांना खडसावणार आहेत, हे स्पष्ट आहे. दरम्यान, पंतप्रधान म्हणून दोन्ही नेत्यांचा हा पहिलाच थेट संवाद आहे. शरीफ यांनी 1999 मध्ये लाहोर येथे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्वागत केले होते.
डॉ. सिंग यांनी ओबामा यांच्याशी केलेल्या चर्चेत याबाबतची भूमिका स्पष्ट केली. पाकिस्तानातील दहशतवादी तळ तत्काळ नष्ट करण्यात यावेत, असे आपण शरीफ यांना कडक शब्दांत बजावणार आहोत. त्यावरच पुढील चर्चा अवलंबून असेल, असे सिंग यांनी सांगितले आहे. भारत व पाकिस्तानचे पंतप्रधान सध्या संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये आले आहेत. शुक्रवारी शरीफ यांनी आमसभेला संबोधित केले. त्यात त्यांनी पुन्हा एकदा काश्मीर राग आळवला. त्यावरून त्यांना शनिवारी स्पष्टीकरणही द्यावे लागले होते. दोन दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर चर्चेतून फारशी अपेक्षा नसल्याची प्रतिक्रिया सिंग यांनी दिली होती.
सिंग व ओबामा यांनी या हल्ल्याचा कडक शब्दांत धिक्कार केला होता. दुसरीकडे शरीफ यांना मात्र या बैठकीकडून खूप अपेक्षा आहेत. 1999 चे सूर पकडून दोन्ही देशांतील व्यापारी संबंध सुधारावेत, अशी शरीफ यांना आशा वाटते. यातून पाकिस्तानला फायदा होईल, असा त्यांचा हेतू आहे. पाकिस्तानकडून सातत्याने सिंग यांना भेटीचे निमंत्रण दिले जात आहे. सिंग यांनी आपल्या जन्मस्थळी भेट द्यावी, असे पाकिस्तानकडून सांगण्यात येत आहे.
शरीफ यांचे भाषणावर स्पष्टीकरण
मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा करण्यापूर्वी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत बोलताना काश्मीरचा राग आळवला होता. आमसभेत काश्मीरविषयीच्या वास्तवाला मांडले आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून कोणी नाराज होण्याचे कारण नाही, हे स्पष्टीकरण शरीफ यांनी जिओ न्यूजच्या मुलाखतीमध्ये दिले. मी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबतच्या चर्चेत ही दरी दूर करण्याचा प्रयत्न जरूर करीन, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
नेमका मुद्दा काय होता?
संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत शरीफ यांनी काश्मीरचा मुद्दा मांडताना ही समस्या 1948 पासून असल्याचे सांगितले. संयुक्त राष्ट्रामध्ये या समस्येचा समावेश तेव्हापासून आहे. आता ती चिघळलेली जखम बनली आहे. संयुक्त राष्ट्राने त्यात हस्तक्षेप करावा, असे शरीफ म्हणाले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.