टोकियो - भारतीयांनो, मातृभाषेतच बोलण्याची सवय लावा,
आपल्या देशाचा अभिमान बाळगा, भारता बद्दल चांगले बोला, अशी भावनिक साद पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जपानमधील भारतीयांना घातली. तब्बल ४०० भारतीयांशी त्यांनी हस्तांदोलनही केले. भारतात उत्पादन सुरू करण्यासाठी ९०० जपानी लघुउद्योजकांना आवाहन करतानाच जपान-भारत एकत्र आल्यास दोन्ही देश महासत्ता होतील, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.
जपानमध्ये पाच हजार भारतीय कुटुंबे आहेत. यातील ४०० जणांची भेट मोदींनी घेतली. भारतीय दुतावासाने हा संवाद घडवून आणला. या वेळी मोदी म्हणाले, तुम्हाला भेटताना अभिमान आिण आनंद वाटत आहे. आपल्या देशाचा अभिमान बाळगा. आपल्या पर्यटनस्थळांची माहिती येथील लोकांना द्या. तुम्हाला मी डॉलर, येन मागत नाही. भारताच्या गावागावांत पर्यटक आणा. हे काम केले तरी वर्षाकाठी दोन ते अडीच हजार जपानी पर्यटक तुम्ही भारतात आणू शकता. मोदी यांनी केलेल्या हस्तांदोलनाने भारतीय भारावून गेले.
लघुउद्योजक भारावले : जपानमधील जेटो या लघुउद्योजक संघटनेच्या ९०० सदस्यांशी मोदी यांनी संवाद साधला. दीड तास मोदी बोलले. कार्यक्रमाला ५०० ते ६०० उद्योजक उपस्थित राहण्याचा अंदाज होता. प्रत्यक्षात ९०० जण आले होते.
...तर जपान-भारत महासत्ता : लघुउद्योजकांना मोदी म्हणाले, आमच्या देशात संधी आहे. आमच्याकडे ६५ टक्के तरुण आहेत. त्यांना तुम्ही रोजगार देऊ शकता. ५० पेक्षा अधिक शहरांत मेट्रो ट्रेनची गरज आहे. तेव्हा भारतात या रेड कार्पेट तयार आहे, असे आवाहन मोदींनी केले. जपान- भारत असे एकत्र आले तर हे दोन्ही देश काही वर्षात महासत्ता होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यात १०० जपानी नागरिक होते. सभागृह खचाखच भरले होते. दाटीवाटीने बसून हे लोक मोदींचे विचार ऐकत होते. लघुउद्योजकांशी भेटीचा कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता होता. तरीही हे लोक दुपारी २.३० वाजेपासूनच शिस्तीत रांगेने सभागृहात येत होते. स्वच्छता आिण स्वयंशिस्त हे जपानी लोकांचे गुण वाखाणण्याजोगे आहेत. गर्दी होण्याचा अंदाज येताच हे लोक स्वत:हून रांग लावतात.