न्यू यॉर्क - न्यू यॉर्कच्या सेंट्रल पार्कवर शनिवारी सायंकाळी नरेंद्र मोदींचा जलवा पाहायला मिळाला. सेंट्रल पार्कवर उपस्थित तरुणांना नरेंद्र मोदींनी विश्व शांतीसाठी साद घातली. लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातील स्वच्छतेच्या मुद्याचा उल्लेखही मोदींनी भाषणात केला. तरुणांच्या कोणतीही गोष्ट शक्य करून दाखवण्याच्या भूमिकेचे मोदींनी कौतुक केले. तरुणांची शक्ती संपूर्ण जगात बदल घडवू शकते असे मोदी यावेळी म्हणाले.
जगभरात स्वच्छता आणि गरीबीच्या विरोधात अभियान चालवणा-या ‘ग्लोबल सिटीझन’ या वेबसाईटच्या सदस्यांना मोदींनी इंग्रजीतून संबोधित केले. त्यावेळी ग्लोबल सिटिजन फेस्टिव्हलमध्ये त्यांनी तरुणांशी संवाद साधताच, मोठ्या जल्लोषात सर्वांनी मोदींना उत्तर दिले. बंद खोलीतील बैठकांऐवजी या कार्यक्रमात सहभागी झाल्याने अधिक आनंदी झाल्याचे मोदी यावेळी म्हणाले.
तरुणाई म्हणजे सर्वांसाठी एक आशा असते. या आशेच्या जोरावर जगात बदल घडवून आणण्याची शक्ती प्राप्त होते. याठिकाणी मला आशेचा एक मोठा किरण दिसत असून
आपल्या सर्वांच्या भवितव्याबाबत अत्यंत आशादायी असल्याचे मोदींनी यावेळी स्पष्ट केले. भारतातही तरुणाईचे हेच आशादायी चित्र असल्याचे मोदी यावेळी म्हणाले. भारतातील सुमारे 80 कोटी तरुणांनी देशात बदल घडवून आणण्यासाठी हात मिळवला असल्याचेही ते म्हणाले आहेत. लोकांना गरीबीच्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी झटण्याचे आवाहन यावेळी मोदींनी तरुणाईला या मंचावरून केले.
संस्कृतमधील काही ओळी मला नेहमी प्रेरणा देतात, त्याच ओळींनी शेवट करण्याची इच्छा व्यक्त करत मोदींनी खालील श्लोक सेंट्रल पार्कवरील तरुणाईला ऐकवला...
सर्वे भवन्तु सुखिनः।
सर्वे सन्तु निरामयाः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु।
मा कश्चित् दुःख भाग्भवेत्॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
पुढील स्लाइड्सवर पाहा सेंट्रल पार्कवरील मोदींचे फोटो...