आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Poroshenko In No Mood To Negotiate With Russian Speaking Separatists

चॉकलेट किंगकडे युक्रेनची सत्ता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कीव्ह - क्रिमिया प्रकरणानंतर अस्थिर झालेल्या युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत चॉकलेट टायकून पेट्रो पोरोशेंको यांचा विजय निश्चित झाला आहे. मतदानाच्या पहिल्या फेरीनंतर त्यांना 50 टक्क्यांहून जास्त मते मिळाली आहेत.
पहिल्या फेरीत पोरोशेंको आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी असल्याचे सांगण्यात आले. देशातील तीन सर्व्हे संस्थांनी केलेल्या पाहणीतील निष्कर्ष 48 वर्षीय पोरोशेंको यांच्या बाजूने आहेत. पोरोशेंको यांना 55.9 टक्के मते मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी युलिया टायमॉशेंका यांना केवळ 12.9 टक्के मते पडली. यासंदर्भातील संपूर्ण निकाल मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे टायमॉशेंको यांनी युक्रेनच्या नागरिकांचे अभिनंदन केले आहे. क्रिमियामुळे देशात वेगळ्या प्रकारचा दबाव निर्माण झाला होता. परंतु त्याला न जुमानता नागरिकांनी लोकशाही व्यवस्थेला बळकट करण्यासाठी मतदानात हिरीरीने सहभाग नोंदवला. त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत, असे टायमॉशेंको यांनी सांगितले. दुसरीकडे रशियन सर्मथकांनी पूर्व युक्रेन भागातील मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण केल्यामुळे सोमवारी त्या भागात मतदान घेण्यात आले. कीव्हमध्ये मतदान केंद्रासमोर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या. देशात रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत सरासरी 60 टक्के मतदान झाले होते.

सर्वात मोठय़ा चॉकलेट कंपनीचे मालक
पोरोशेंको हे अब्जाधीश उद्योगपती आहेत. ते युक्रेनमध्ये चॉकलेटची निर्मिती करणार्‍या सर्वात मोठय़ा चॉकलेट कंपनीचे मालक आहेत. पहिल्या फेरीनंतरच त्यांना 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली होती. या निवडणुकीत 18 उमेदवार होते. माजी पंतप्रधान यूलिया ताइमोशेंको दुसर्‍या क्रमांकावर राहिल्या.

डोनेत्सक विमानतळ बंद
राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या दुसर्‍या दिवशी पूर्वेकडील शहर डोनेत्सक येथील विमानतळाला बंद करावे लागले. रशियन सर्मथक तथा सशस्त्र बंडखोरांनी विमानतळावर चढाई केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. बंडखोरांच्या गटाने विमानतळ भागात प्रवेश केला. गोळीबारही केला. तेथील सुरक्षा रक्षकांना त्यांनी विमानतळ सोडण्यास सांगितले. त्यानंतर अनेक तास सुरक्षा रक्षक व बंडखोर यांच्या धुमश्चक्री झाली. काही तासानंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले.

एक्झिट पोल नेमका कसा ?
एक्झिट पोलमध्ये देशातील 17 हजाराहून अधिक मतदारांची पाहणी करण्यात आली. यातील 50 टक्क्यांहून अधिक कौल पोरोशेंको यांच्या बाजूने दिसून आला. रूझुमकोव्ह सेंटर, कीव्ह इंटरनॅशनल सोशियालॉजी इन्स्टिट्यूट आणि डेमोक्रॅटिक इनिशिएटिव्हज फाउंडेशन या तीन संस्थांच्या वतीने हा अभ्यास करण्यात आला.

रशियासोबत कराराची तयारी
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत काम करण्यास तयार आहात का, या प्रश्नाला पोरोशेंको यांनी बगल दिली. परंतु आपल्या नेतृत्वाखाली रशियासोबत सुरक्षेचा नवीन करार करण्याची आपली तयारी असल्याचे पोरोशेंको यांनी स्पष्ट केले.

शांततेला प्राधान्य
पोरोशेंको यांनी सोमवारी मीडियाशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. युक्रेनच्या भूमीवर शांतता प्रस्थापित करण्यास आपले प्राधान्य असेल, असे पोरोशेंको यांनी जाहीर केले. ते लवकरच अशांत असलेल्या कोळसा खाणीच्या प्रदेशाला पोरोशेंकोला भेट देणार आहेत.

पाश्चात्त्यवादी पोरोशेंकोच्या डोक्यावर काटेरी मुकुट
पोरोशेंको यांची प्रतिमा पाश्चात्त्यवादी आहे. त्यामुळे एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरला तर पाश्चात्य देशांच्या बाजूने जनतेने कौल दिल्याचे स्पष्ट होणार आहे. परंतु पोरोशेंको यांच्यासमोर बंडखोरांना हाताळण्याचे मोठे आव्हान आहे. आम्ही पोरोशेंको किंवा अन्य कोणालाही ओळखत नाहीत. त्यामुळे आम्ही स्वातंत्र्यासाठी आमचा संघर्ष सुरूच ठेवणार असल्याची ताठर भूमिका बंडखोरांनी घेतली आहे.