हनोई (हो ची मिन्ह सिटी) - भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्हिएतनाममध्ये मोदी सरकारवर स्तुतिसुमने उधळली आहेत. विशेष म्हणजे मुखर्जींच्या भाषणादरम्यान झालेले हे कौतुक लिखित भाषणाव्यतिरिक्त होते. मोदी सरकारने भारतात गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरणनिर्मिती केल्याचे ते म्हणाले.
प्रणव मुखर्जी मंगळवारी व्हिएतनाममधील ऐतिहासिक शहर हो ची मिन्ह सिटीत भारतीयांच्या समूहाला संबोधित करत होते. भाषणादरम्यान त्यांनी पंतप्रधानांचा जपान दौरा अभूतपूर्व झाल्याचे सांगत यामुळे भारतात परकीय गुंतवणूक वाढेल, अशी आशा व्यक्त केली. मुखर्जी म्हणाले, ‘पंतप्रधान
नरेंद्र मोदी बुधवारी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे गुजरातमध्ये स्वागत करतील. १८ सप्टेंबर रोजी त्यांची भेट घेणे, हे माझे पहलिे कर्तव्य आहे.’ राष्ट्रपती म्हणाले, ‘मोदी सरकारमध्ये धर्मेंद्र प्रधान पेट्रोलियम मंत्री झाल्यानंतर या क्षेत्रात गुडलक आले आहे. कच्च्या तेलाच्या किमतीही कमी झाल्या आहेत.’
भारत ही वेगवान अर्थव्यवस्था
यापूर्वी हेनॉय येथे व्हिएतनामच्या राष्ट्रपतींतर्फे मुखर्जी यांच्या सन्मानार्थ भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या वेळी बोलताना प्रणव मुखर्जी म्हणाले की, भारत ही दुसऱ्या क्रमांकावरील झपाट्याने विस्तारणारी अर्थव्यवस्था आहे. भारत व्हिएतनामदरम्यान व्यापार, गुंतवणूक, विज्ञान, तंत्रज्ञान, मनुष्यबळ विकास आणि संस्कृती क्षेत्रात सहकार्याच्या अनेक संधी आहेत.
नेहरू व मिन्हचे स्मरण
मुखर्जी यांनी व्हिएतनामचे प्रसिद्ध नेता हो ची मिन्ह आणि भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या संबंधांचेही स्मरण केले. ते म्हणाले, ‘या दोन नेत्यांनी भारत-व्हिएतनामदरम्यानच्या संबंधांचे सामर्थ्य ओळखले होते.’