आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prime Minister Manmohan Singh Congratulates Nawaz Sharif

मनमोहन-शरीफांचे एकमेकांना निमंत्रण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर - पाकिस्तानच्या निवडणुकीत बहुमताने विजयी झालेले पीएमएल-एनचे अध्यक्ष नवाझ शरीफ यांनी शपथविधी समारंभासाठी भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना निमंत्रण द्यायला आनंद वाटेल असे म्हटले आहे. दरम्यान, चीनचे नवीन पंतप्रधान ली केकियांग हे पुढील आठवड्यात पाकिस्तानच्या दौर्‍यावर जाणार असून चीनने शरीफ यांच्या विजयाचे स्वागत केले आहे.

त्यांना निमंत्रण द्यायला मला आनंदच वाटेल आणि जर ते आलेच तर तो माझ्यासाठी व पाकिस्तानसाठी अत्यंत आनंदाचा क्षण असेल, असे शरीफ यांनी परदेशी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मनमोहनसिंग यांनी रविवारीच आपणास दूरध्वनी केला होता. त्यांच्याशी दीर्घकाळ चर्चा झाली. त्यांनी मला भारत भेटीचे तर मी त्यांना पाकिस्तान भेटीचे निमंत्रण दिले. मी त्यांना निमंत्रण देणारच आहे. ते येतील किंवा नाही हा वेगळा भाग आहे. पण ते लवकरच पाकिस्तान दौर्‍यावर येतील अशी अपेक्षा आहे. शपथविधी समारंभाला ते हजर राहिले तर तो माझा सन्मानच असल्याचे शरीफ म्हणाले.

दरम्यान, चीननेही शरीफ यांच्या विजयाचे स्वागत केले आहे. ली हे पाकिस्तान दौर्‍यावर येत असून त्यांच्या दौर्‍यामुळे जुना सहकारी असलेल्या पाकिस्तानबरोबरचे द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत होतील, अशी अपेक्षा चीनने व्यक्त केली आहे. अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या निमंत्रणावरून ली हे 22 व 23 मे रोजी पाकिस्तानच्या दौर्‍यावर जात आहेत.