आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लठ्ठपणा : एक जगण्यास, दुसरा मरणास लायक नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- लठ्ठपणा आरोग्य व सामाजिक पातळीवर किती धोकादायक ठरू शकतो, याचा प्रत्यय अमेरिका व न्यूझीलंडमधील घटनेतून आला आहे. अमेरिकेत अनेक वर्षे तुरुंगात राहिलेल्या गुन्हेगाराला फाशी होण्याअगोदरच लठ्ठपणामुळे प्राण गमवावे लागले, तर न्यूझीलंडमधील एका नागरिकावर अतिलठ्ठपणामुळे देश सोडण्याची वेळ आली आहे.

ओहिओ तुरुंगात रोनाल्ड पोस्ट नावाच्या कैद्याने 28 वर्षे काढली. त्याला 1983 मधील हॉटेल कामगाराच्या हत्येबद्दल फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्याला सरलेल्या जानेवारी महिन्यात इंजेक्शन देऊन मारण्यात येणार होते; त्याविरोधात रोनाल्डने याचिका दाखल केली होती. रोनाल्डचे वजन 220 किलोग्रॅम एवढे होते. इंजेक्शनमुळे त्याचा प्रचंड छळ होईल. ही प्रक्रिया सुमारे 16 तास चालणारी असल्याने हा अमानुषपणा नको, असा युक्तिवाद रोनाल्डच्या वकिलाकडून करण्यात आला होता. त्याला न्यायालयाने ग्राह्य धरले होते. अति लठ्ठपणामुळे त्याच्या हालचाली मंदावल्या होत्या. त्यातून अनेक विकार त्याला जडले होते. शुक्रवारी ओहिओ तुरुंगाच्या रुग्णालयात त्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. रोनाल्डच्या बाजूने योग्य प्रकारे बचावाची भूमिका मांडण्यात आली नव्हती, असे ओहिओचे गव्हर्नर जॉन काशिच यांचे म्हणणे आहे.

वजन खूप जास्त, देश सोडा !

एखाद्या व्यक्तीचे वजन प्रमाणाबाहेर असल्यामुळे त्याला देश सोडण्याची वेळ यावी, असे उदाहरण शोधूनही सापडणार नाही. परंतु न्यूझीलंडमध्ये शेफ म्हणून काम करणार्‍या दक्षिण आफ्रिकेच्या एका नागरिकाला प्रशासनाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. अल्बर्ट बिटेनहीस असे या शेफचे नाव आहे. त्याचे वजन 130 किलो आहे. तुमचे वजन खूप जास्त आहे. प्रमाणित आरोग्याच्या निकषात हे बसत नाही. त्यामुळे देश सोडा, असा इशारा स्थलांतरविषयक विभागाने अल्बर्टला दिला आहे. अल्बर्ट 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेहून ख्रिस्टचर्चला आला होता. त्यामुळे त्याला आता वार्षिक व्हिसा मिळवण्यातही अडचणी येऊ लागल्या आहेत.