कैरो- इजिप्त क्रांतीचे प्रणेते अला अब्देल फतह यांना न्यायालयाने 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. परवानगी न घेता आंदोलन व निदर्शने करण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून याच आरोपात आणखी 24 जणांनाही 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे.
इजिप्तचे माजी लष्करप्रमुख अल सिसी यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ही पहिलीच मोठी शिक्षा आहे. सिसी यांनी तीनच दिवसांपूर्वी सूत्रे स्वीकारली आहेत. इजिप्तमध्ये आंदोलनविरोधी कायदा गेल्या वर्षी लागू झाला होता. या कायद्यामुळे देशात राजकीय स्वातंत्र्य धोक्यात येईल अशी शंका व्यक्त केली जात होती. ती खरी ठरली आहे. या कायद्यानुसार 10 पेक्षा अधिक व्यक्तींच्या सार्वजनिक कार्यक्रम, निदर्शने अथवा बैठकीवर गृहमंत्रालय बंदी घालू शकते.
कोण आहेत अब्देल फतह
तत्कालीन हुकूमशहा होस्नी मुबारक यांच्या सत्तेविरोधात सन 2011 मध्ये उठाव झाला होता.त्या वेळी 33 वर्षीय अब्देल फतह हे क्रांतीचे प्रणेते बनले होते. त्यांनी आंदोलने, निदर्शने आणि सोशल नेटवर्किंगचा प्रभावी वापर करून जनजागृती केली होती. त्यांच्या आंदोलनामुळेच मुबारक यांची 29 वर्षांची सत्ता उलथवली गेली. त्यानंतर निवडणुका होऊन मुहम्मद मुर्सी राष्ट्राध्यक्ष बनले होते. मुर्सीविरोधातही आंदोलन झाल्यानंतर लष्कराने सत्ता ताब्यात घेतली होती. मुर्सी समर्थकांसोबतच धर्मनिरपेक्ष कार्यकर्त्यांनाही अटक केली. त्यात अब्देल यांचाही समावेश होता.
ओबामांकडून अल सिसींना शुभेच्छा
इजिप्तचे नवे राष्ट्राध्यक्ष अल सिसी यांना अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. इजिप्तला भरघोस मदत देण्याचे व सोबत काम करण्याचे आश्वानही ओबामांनी फोनवरून दिले.