आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेच कायम : कादरी समर्थकांचे अटकसत्र, सरकारशी चर्चा फिसकटली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानातील राजकीय पेच सुटण्याची चिन्हे असतानाच शनिवारी धर्मगुरू ताहिर-उल-कादरी यांनी सरकारसोबतच्या चर्चेतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. शरीफ सरकारने एकीकडे चर्चा करताना दुसरीकडे मात्र कार्यकर्त्यांना अटक करण्याचा धडाका लावल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कादरी यांनी स्पष्ट केले.

इस्लामाबाद तसेच देशभरात सरकारने अटकसत्र राबवल्यामुळे मला चर्चेतून बाहेर पडावे लागत आहे, असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. महिनाभरापासून देशात हा राजकीय पेच सुरू आहे. राजधानीत संसदेच्या परिसरात महिन्यापासून निदर्शकांनी तळ ठोकले आहे. त्यांना हुसकावण्याचा वारंवार प्रयत्न करण्यात आला. परंतु कादरी आणि क्रिकेटपटू इम्रान खान यांचे समर्थक या परिसरात तसेच देशात अनेक ठिकाणी आंदोलन करत आहेत. त्यामुळे सरकारने अखेर शुक्रवारी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. विरोधकांच्या सुमारे ३०० कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

सरकारची वागणूक चुकीची आहे. त्यामुळेच आम्ही चर्चेतून बाहेर पडत असल्याचे अवामी तेहरिकचे प्रवक्ते गुलाम अली यांनी स्पष्ट केले. अशा परिस्थितीत आम्ही चर्चेत सहभागी होऊ शकत नाहीत, असे पक्षाचे सरचिटणीस जहांगीर खान तरीन यांनीही एका टीव्ही वाहिनीशी बोलताना सांगितले. गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या आंदोलनात आतापर्यंत ५५० जण जखमी झाले.
सरकारचा वेगळाच दावा
कादरी चर्चेतून बाहेर पडल्यामुळे संघर्ष कमी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु याच आठवड्यात सरकारने इम्रान खान यांच्याशी सर्व मुद्द्यांवर सहमती झाल्याचा दावा केला होता. त्यात शरीफ यांच्या राजीनाम्यावर मात्र खान यांनी असहमती दाखवली असली तरी इतर मुद्द्यांवर करार करण्याची खान यांची तयारी असल्याचे सांगण्यात आले होते. शरीफ यांनी सत्ता सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

लष्कराचा पाठिंबा नाही -इम्रान खान
आम्हाला पाकिस्तानी लष्कराच्या पाठिंब्याची गरज नाही. आमच्याकडे अगोदरच पाकिस्तानी नागरिकांचे सैन्य बळ आहे, असे पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांनी म्हटले आहे.

नेमका पेच काय ?
नवाज शरीफ यांनी सत्ता सोडावी, अशी मागणी इम्रान खान आणि कादरी यांनी लावून धरली आहे. एक महिन्यापासून हे आंदोलन सुरू आहे. १४ ऑगस्टपासून आंदोलनाला सुरुवात झाली होती. त्यानंतर ते देशभरात पोहोचले. आंदोलनाच्या काळात राजधानीतील संसदेसह, राष्ट्राध्यक्ष भवन इतर महत्त्वाच्या इमारतींवर कार्यकर्त्यांनी चाल केली होती. सार्वत्रिक निवडणुकीत गैरव्यवहाराचा आरोप करून इम्रान खान यांनी तर देशाला क्रांती हवी म्हणत कादरी यांनी आंदोलन छेडले.

(फोटो : निदर्शकांना न्यायालयात नेले जात असताना तेहरिक-ए-इन्साफच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी पोलिसांच्या व्हॅनसमोर निदर्शने केली त्याचबरोबर वाहनाच्या चाकामधून हवादेखील सोडली)