आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कतारच्या वाळवंटात अन्नधान्य आणि पाण्याची शेती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आखातातील अरब राष्ट्रांचे वाळवंट हिरवेगार करण्यासाठी अनोख्या योजना पुढे येत असतात. 1977 मध्ये सौदी राजपुत्राने हिमनद्यांद्वारे आखाताची तहान भागवण्यास सुचवले होते. दीर्घकाळापासून कोरड्या असलेल्या जमिनीतून पीक घेण्याच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी कृत्रिम ढगांमधून पाऊस, झाडांची भिंत उभी करणे यांसारखे कित्येक उपाय संशोधकांनी करून पाहिले. पृथ्वीचा 41 टक्के भाग कोरडा आहे. या परिसरात दोन अब्ज लोक राहतात. हवामान बदलाच्या शंकेमुळे जागतिक पातळीवर अन्नधान्य टंचाईच्या संकटाची चाहूल लागली आहे. कतारमध्ये एकही नदी किंवा तलाव नाही. वर्षभरातून फक्त 2.9 इंच पाऊस पडतो.

कतार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्यक्रमाचे प्रमुख फहद बिन मोहंमद अल अत्तिया आपल्या देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचे स्वप्न पाहत असतात. त्यांना आशा आहे की, येणा-या बारा वर्षांत कतार आपल्या अन्नधान्याच्या गरजेपैकी निम्मे उत्पादन करू शकेल. सध्या गरजेच्या 90 टक्के अन्नधान्य आयात केले जाते. वाळवंटात शेतीच्या प्रकल्पाचा आराखडा तीस अब्ज डॉलरचा आहे. त्यानुसार समुद्राचे खारे पाणी शुद्ध करून पिकांसाठी देणे आणि काही मैलांचे ग्रीन-हाउस बनवण्यासाठी तरतूद केली आहे. समुद्राच्या पाण्यातून मीठ वेगळे करण्याचे प्रकल्प सौरऊर्जेवर चालवले जाणार आहेत.