आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांना ‘मणिपूर लॉटरी’ प्रश्नपत्रिकेसोबत उत्तरेही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंफाळ- मणिपूरमध्ये बारावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांची ‘इंजिनिअरिंग ड्रॉइंग’च्या पेपरला लॉटरीच लागली होती. त्यांना देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेच्या पाठीमागच्या बाजूला त्या प्रश्नांची उत्तरेही छापून देण्यात आली होती. मात्र, काही विद्यार्थ्यांनी यासंबंधीची तक्रार केल्यानंतर प्रश्नपत्रिका लगेच मागे घेण्यात आली आणि या पेपरची परीक्षाच रद्द करण्यात आली.
मणिपूर उच्च माध्यमिक शिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात येत असलेल्या बारावी परीक्षेचा शनिवारी ‘इंजिनिअरिंग ड्रॉइंग’ पेपर होता. हजारो विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रश्नपत्रिकेसोबत कोर्‍या उत्तरपत्रिका देण्यात आल्या. शिक्षण परिषदेने आपणास प्रश्नपत्रिकेसोबतच रेडिमेड उत्तरेही दिल्याची बाब काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आली. प्रश्नपत्रिकेच्या मागच्या बाजूला सर्वच्या सर्व प्रश्नांची उत्तरे छापण्यात आली होती. त्यांनी पर्यवेक्षकाकडे तक्रार केल्यानंतर लगेचच प्रश्नपत्रिका मागे घेण्यात आली आणि या पेपरची परीक्षाच रद्द करण्यात आली. प्रश्नपत्रिकेमध्येच प्रश्नांची उत्तरेही छापण्यात आल्याचे पाहून मलाही आश्चर्याचा धक्का बसला. हा मुद्रण दोष नाही. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली असल्याचे शिक्षण परिषदेचे अध्यक्ष सांगोलसेम किरण यांनी म्हटले आहे. शिक्षण परिषदेच्या चुकीसाठी विद्यार्थ्यांची फरपट होऊ नये म्हणून पुनर्परीक्षा न घेता या विषयाचे सर्व गुण विद्यार्थ्यांना द्यावेत, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे. 25 मार्च रोजी या पेपरची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे.