आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैदेची शिक्षा चुकवण्यासाठी अतिरेकी राणाचा आटापिटा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिकागो - लष्कर-ए-तोयबाला सहकार्य करणा-या आणि वृत्तपत्रावरील हल्ल्यात अमेरिकी न्यायालयाने दोषी ठरवलेला पाकिस्तानी-कॅनेडियन तहव्वुर राणा शिक्षेच्या निर्णयाला आव्हान देणार आहे, असे त्याच्या वकिलाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गुरुवारी न्यायालयाने राणाला (52) दोषी ठरवताना 14 वर्षांची कैदेची शिक्षा ठोठावली. न्यायालयाच्या निर्णयाला तो निश्चितपणे आव्हान देण्यासाठी तयार असेल. त्यादृष्टीने माझी राणासोबच चर्चा होईल. त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे पीटर बेलगन यांनी सांगितले. ते पत्रकारांशी बोलत होते. एकूण खटल्यामध्ये काही त्रुटी राहिल्या आहेत का, हे पाहण्यासाठी अपील करणे महत्त्वाचे ठरणार आहे. आम्हाला न्यायमूर्ती हॅरी लिनेवेबर यांच्याविषयी आदर आहे. त्यांना या प्रकरणात गंभीर गुन्हा वाटला. त्यामुळेच त्यांनी ही शिक्षा ठोठावली आहे. आम्ही निश्चितपणे आव्हान देऊ. राणा हा कॅनेडियन नागरिक आहे.

2009 मध्ये अटक केल्यानंतर दिलेल्या जबाबात राणाने अनेक गोष्टींची कबुली दिली होती. लष्कर-ए-तोयबाच्या बैठकीला डेव्हिड हेडलीने हजेरी लावली होती. 2002 आणि 2005 मधील बैठकीला हेडली हजर होता. शिवाय हेडली लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांकडून मिळणा-या सूचनेनुसार काम करतो, असे त्याने कबुलीत स्पष्ट केले होते. त्याच आदेशानुसार तो मुंबईत दाखल झाला होता. पाच वेळा मुंबईला भेट देऊन निरीक्षण केले होते. त्यानंतर मुंबईवरील हल्ला घडवून आणण्यात आला. त्यात 160 जणांचा मृत्यू झाला होता. मुंबईवरील हल्ल्यातील इतर खतरनाक दहशतवादी इलियास काश्मिरी, साजिद मिर यांच्यासह इतर चार जणांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या मुसक्या आवळून त्यांना शिक्षा मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तीन वर्षांपासून तुरुंगात
राणाला आॅक्टोबर 2009 मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरुंगात आहे. त्यामुळे त्याला झालेल्या शिक्षेतून तीन वर्षे कमी होतील. त्याने चांगले वर्तन दाखवले तर त्याची शिक्षादेखील कमी केली जाऊ शकते. त्याला आणखी दहा वर्षे तुरुंगात राहावे लागेल. त्याची सुटका 62 व्या वर्षी होऊ शकेल, असा विश्वास बेलगन यांनी व्यक्त केला आहे.
हेडलीचा फैसला 24 रोजी
मुंबई हल्ल्यातील आरोपी राणाचा सहकारी डेव्हिड हेडली मार्च 2010 च्या सुनावणीत दोषी आढळून आला आहे. सहा अमेरिकी आणि मुंबईतील हत्या घडवण्याच्या कटातील सहभाग असल्याचा त्याच्यावरील आरोप सिद्ध झाला आहे. या प्रकरणाचा निकाल 24 जानेवारी रोजी होण्याची शक्यता आहे.