आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Relatives Erupt With Grief As Malaysia Confirms Plane Is Lost

मलेशियन वकिलातीसमोर चीनी नातेवाइकांची निदर्शने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्वालालंपूर - बेपत्ता मलेशियन विमानातील नातेवाइकांच्या संयमाचा बांध मंगळवारी फुटला. त्यांना मलेशियन एअरलाइन्सने बीजिंगच्या हॉटेलमध्ये उतरवले होते. 17 दिवसांपासून त्यांचे कान कुटुंबीय जिवंत असल्याची बातमी ऐकण्यासाठी अधीर झाले होते; परंतु सोमवारी रात्री त्यांना ‘ऑल लाइव्हज आर लॉस्ट’ अशा चार शब्दांचा एसएमएस मिळाला. त्यानंतर सकाळी सुमारे 300 नातेवाइकांनी बीजिंगमधील मलेशियाच्या दूतावासमोर जोरदार निदर्शने करून संताप व्यक्त केला.

संतप्त झालेल्या नातेवाइकांनी राजदूत कार्यालयावर पाण्याच्या बाटल्या भिरकावल्या. मलेशियाच्या राजदूतांची भेट घेण्यासाठी बळजबरीने कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पत्रकारांना भेटण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी त्यांना रोखले. त्या वेळी त्यांची पोलिसांशी चकमक उडाली. चीनमध्ये अशा प्रकारची निदर्शने पाहायला मिळत नाहीत. बेपत्ता विमान एमएच 370 मध्ये 239 जण होते. यातील 154 चिनी आहेत.

चीन अचंबित, प्रश्न उपस्थित केला
मलेशियाच्या पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेवर चीनकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री शी हाँगशेंग यांनी सोमवारी रात्रीच मलेशियाचे राजदूत इस्कंदर बिन सरुदीन यांच्याशी चर्चा केली होती. विमानासंबंधीच्या सर्व निष्कर्षांबद्दलचे सर्व पुरावे देण्याची विनंती चीनकडून करण्यात आली आहे.

ब्लॅक बॉक्स न मिळाल्याने गूढ
बेपत्ता विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळणे गरजेचे आहे. हा बॉक्स मिळेपर्यंत दुर्घटनेच्या कारणाचा वेध घेता येणार आहे. बॉक्सची बॅटरी घटनेच्या 30 दिवसांपर्यंत चांगली राहू शकते, परंतु त्यानंतर मात्र दुर्घटनेचे कारण शोधण्याचे काहीच साधन राहणार नाही. दरम्यान, पर्थपासून सुमारे अडीच हजार किलोमीटर क्षेत्रफळ परिसरात विमानाच्या अवशेषांचा सातत्याने शोध घेण्यात आला, परंतु मंगळवारी येथे प्रचंड पाऊस झाला. 200 ते 500 फुटांपर्यंत खाली आलेले ढग मोहिमेत अडथळा आणत होते.

वृत्तपत्रे काळ्या रंगात
मृत चिनी नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मंगळवारी चीन व मलेशियातील काही आघाडीचे वृत्तपत्रे काळ्या रंगात प्रकाशित करण्यात आली. क्वालालंपूरच्या ‘द स्टार’ या इंग्रजी वृत्तपत्राने पहिल्या पानावर ठळकपणे-एमएच 370 आरआयपी अशी अक्षरे प्रकाशित केली आहेत. द न्यू स्ट्रेट्स टाइम्सने पहिल्या पानावर केवळ एक विमान छापले आहे. त्यावर गुडनाइट एमएच 370 असे लिहिले आहे.