आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Replica Of Bamiyan Budha Statues To Be Made In UP Says Rajnath Singh

बामियान बुद्धमूर्तीची प्रतिकृती यूपीत उभारणारः राजनाथसिंहांचा मनोदय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अफगाणिस्तानातील तालिबान्यांनी उद्ध्वस्त केलेल्या बामियान बुद्धमूर्तीची प्रतिकृती गौतम बुद्धांचे परिनिर्वाण प्राप्त झालेल्या उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये उभारण्याचा मनोदय भाजप अध्यक्ष राजनाथसिंह यांनी व्यक्त केला आहे. राजनाथ हे 5 दिवसांच्या अमेरिका दौर्‍यावर आहेत.

भारत आणि अनिवासी भारतीय अध्ययन प्रतिष्ठान, भारत-अमेरिका राजकीय कृती समिती आणि अमेरिकी परराष्ट्र धोरण परिषदेच्या वतीने कॅपिटॉल हिल येथे आयोजित अफगाण परिषदेत त्यांनी हा मनोदय व्यक्त केला. मध्य अफगाणिस्तानातील हजारजत प्रदेशातील बामियान खोर्‍यात डोंगरात सहाव्या शतकात बुद्धांच्या दोन उभ्या मूर्ती कोरण्यात आल्या होत्या. तालिबानी राजवटीत सन 2001 मध्ये तोफा डागून या बुद्धमूर्ती उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या. त्या वेळी मी उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री होतो, अशी आठवणही राजनाथसिंह यांनी सांगितली.


तालिबानशी शांतता बोलणी करताना सावधान
तालिबानी ही दहशतवादी संघटना कधीही आपले रंग बदलू शकते. त्यामुळे सलोख्याचे प्रयत्न निष्फळ होण्याचा धोका असल्याने त्यांच्याशी शांतता बोलणी करताना सावधगिरी बाळगा, असा इशारा राजनाथसिंह यांनी अमेरिकेला दिला आहे. पाकिस्तानी लष्कराच्या सहकार्याने तालिबान्यांशी चर्चा केली तर परिस्थिती आणखी भयावह होईल, असे ते म्हणाले.


गिलगीट, बाल्टिस्तानमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली
पाकिस्तानने बेकायदा ताब्यात घेतलेल्या जम्मू आणि काश्मीरच्या गिलगीट व बाल्टिस्तान प्रदेशात मानवी हक्कांच्या पायमल्लीचा मुद्दा राजनाथ यांनी लावून धरला. गिलगीट-बाल्टिस्तानमधून मध्य आशियाशी संपर्क प्रस्थापित करण्याचा हक्क भारताला मिळाला पाहिजे, या प्रदेशाचे सामरिक महत्त्व दुर्लक्षित केल्याने संपूर्ण आशियाची सुरक्षाच धोक्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.