आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशीच शिकार होत राहिली तर 2020 नंतर गेंडा दिसेल केवळ पुस्तकात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- याच गतीने अवैध शिकार होत राहिली तर 2020 पर्यंत पृथ्वीवरून गेंडा हा प्राणी नामशेष होईल, असा धोक्याचा इशारा वन्यजीव तज्ज्ञांनी दिला आहे.
गेल्या सहा महिन्यांत पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या गेंड्यांच्या शिकारीत मोठी वाढ झाली आहे. 2007 मध्ये केवळ सात गेंड्यांची शिकार करण्यात आली होती. परंतु, गेल्या सहा वर्षांत या आकड्यात कमालीची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी तब्बल 1,004 गेड्यांची अवैध कत्तल करण्यात आली आहे.
यासंदर्भात बॉर्न फ्री फाऊंडेशनचे प्रमुख कार्यकारी अधिकारी विल ट्रॅव्हर्स म्हणाले, की सध्या 20,000 पांढरे आणि 5,000 काळ्या रंगाचे गेंडे शिल्लक आहेत. जर याच गतीने शिकार होत राहिली तर येत्या सहा वर्षांत काळ्या रंगाचे गेंडे नामशेष होतील. यावेळी जे गेंडे शिल्लक राहतील त्यांना मिलिटरी स्टाईलने तयार करण्यात आलेल्या कम्पाऊंडमध्ये ठेवावे लागेल. त्यांच्या रक्षणासाठी शस्त्रधारी सुरक्षा रक्षक तैनात करावे लागतील. आपल्याला जंगलात मुक्तपणे फिरणारे गेंडे दिसणार नाहीत.
दक्षिण आफ्रिकेतील प्रियोरिया येथे आयोजित करण्यात आलेल्या 'वन्यजीवांसंदर्भातील गुन्हे' या विषयावरिल परिषदेनंतर विल ट्रॅव्हर्स म्हणाले, की शिंगासाठी गेंड्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार केली जाते. त्यातून काही शिकारी कोट्यवधी रुपये कमवित आहेत. पारंपरिक औषधांची निर्मिती करण्यासाठी या शिंगांचा वापर केला जातो. गेंड्यांची शिकार करताना एखाद्या व्यक्तीला पकडले तर त्याला अगदी शुल्लक स्वरुपाची शिक्षा होते. त्यामुळे सध्या असलेल्या कायद्यांमध्ये बदल करण्याची गरज आहे. वन्यजिवांच्या शिकारीबाबत नेमकी माहिती मिळविण्यासाठी गुप्तचर यंत्रणा अधिक मजबूत करावी लागणार आहे.