आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण रशियाला मुसळधार पावसाचा तडाखा, 146 जण मृत्युमुखी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिम्स्क- रशियात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे दक्षिण भागाला महापुराचा तडाखा बसला असून यात 146 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 29 हजार लोक बेघर झाले आहेत. महापुराचा सर्वाधिक फटका दक्षिणेतील क्रिम्स्क व क्रॅन्सडार परिसराला बसला आहे.
रशियात शुक्रवारी झालेल्या पावसाने महापुराचे संकट ओढवले आहे. पाण्याचा दाब प्रचंड होता. पाण्याच्या प्रवाहाने या भागातील मार्ग वाहून गेले. अनेक ठिकाणचा
संपर्क तुटला. घरे जमीनदोस्त झाल्याचे पाहायला मिळाले. नागरिक झोपेत असताना महापुराचा तडाखा बसल्याने काय घडले, याची कल्पना बराच वेळ आली नाही. त्यामुळे आणखीनच गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
रशियाच्या टीव्ही वाहिन्यांवरून दाखवण्यात आलेल्या फुटेजमध्ये हजारो घरांत पाणी शिरल्याचे दिसत होते. स्वत:चा बचाव करण्यासाठी नागरिकांनी घराच्या छतावर रात्र काढली. क्रिम्स्क भागात सर्वाधिक नुकसान झाले. या भागातील पुरामुळे सुमारे 13 हजार लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आपद्ग्रस्त भागाचा दौरा केला. त्यानंतर त्यांनी आपत्कालीन बैठक बोलावली.
या घटनेत मृत्युमुखी पडलेले नागरिक हे प्रामुख्याने क्रिम्स्क भागातील आहेत. येथील अनेक नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. क्रिम्स्कची लोकसंख्या 57 हजार आहे. आतापर्यंत 134 मृतदेह सापडले आहेत. यात एक वर्षाच्या व एका दहा वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. काळ्या समुद्राच्या वायव्येला 200 किलोमीटर अंतरावर क्रिम्स्क शहर आहे. याच भागात रशियन सरकारने 2014 मध्ये होणाºया आॅलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. क्रॅन्सडार प्रदेशाला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. प्रदेशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे. या घटनेमुळे रशियातील आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले.
निवृत्तांचे गाव - क्रिम्स्क हे गाव तसे शांत. निसर्गाच्या कुशीतले. या वैशिष्ट्यामुळे या गावात निवृत्तांची संख्या अधिक होती. याच गावावर नैसर्गिक संकट ओढवले आहे, असे प्रादेशिक तपास अधिकारी इव्हान सेनगर्व्हा यांनी सांगितले.