गीतेवर बंदी घालण्याची / गीतेवर बंदी घालण्याची याचिका रशियात फेटाळली

वृत्तसंस्था

Dec 28,2011 07:38:39 PM IST

मास्को- भगवदगीतेमुळे धार्मिक सलोख्याला बाधा पोहचत असल्याचे कारण पुढे करून तिच्यावर बंदी घालण्याची याचिका सैबेरियातील स्थानिक न्यायालय टॉम्स्कीने बुधवारी फेटाळून लावली. दरम्यान, परराष्ट्रमंत्री एस.एम. कृष्णा यांनी रशियातील न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
इस्कॉनचे संस्थापक स्व. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी 'भगवदगीता ऍज इट इज' नावाने गीतेचा अनुवाद केला आहे. या अनुवादासह अन्य हिंदू साहित्यावरही बंदी घालावी, अशी मागणी रशियातील ख्रिश्चन ऑर्थोडॉक्स चर्चने केली आहे. रशियातील तोमस्‍क या शहरातील एका न्‍यायालयात यासंदर्भात खटला सुरु आहे. या साहित्यामुळे धार्मिक सलोख्याला हानी पोहोचते, असा युक्तिवाद न्यायालयात केला होता. या प्रकरणानंतर रशियातील सुमारे १५ हजार हिंदू व इस्कॉनच्या सदस्यांनी भारताकडे राजनैतिक हस्तक्षेपाची मागणी केली आहे. इस्कॉनच्या वकिलांनी या संदर्भात रशियन लोकायुक्त तसेच मॉस्को व सेंट पीटर्सबर्ग येथील भारताचा अभ्यास असणा-या तज्ज्ञांचे मत विचारात घ्यावे, अशी विनंती केली होती. या विनंतीचा विचार करून न्यायालयाने हा निर्णय २८ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलला होता. त्याबाबत सैबेरिया येथील टॉम्स्की न्यायालयाने बंदी घालण्याचा निकाल देताना ख्रिश्चन ऑर्थोडॉक्स चर्चची याचिका फेटाळून लावली आहे. हे प्रकरण जून महिन्यापासून न्यायालयात प्रलंबित होते.
दरम्यान, याचे पडसाद भारतातील संसदेत उमटले होते. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी लॉर्ड कृष्णा यांचा अपमान आणखी सहन करणार नाही, अशी भूमिका घेतली. त्याला संसदेतील अनेक सदस्यांचा पाठिंबा मिळाला होता.
बिजू जनता दलाचे नेते भर्तुहारी महताब यांनीही हा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच याबाबत सरकारने तत्काळ हस्तक्षेप करून, रशियातील हिंदूंचे स्वातंत्र्य अबाधित राखावे, अशी मागणी केली होती.

X
COMMENT