आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएसची आर्थिक रसद रोखून नाकेबंदी करणार - संयुक्त राष्ट्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्र - संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेची आर्थिक रसद रोखून नाकेबंदी करण्याची योजना आखली आहे. त्यासाठी पुढील आठवड्यात महत्त्वपूर्ण ठराव मंजूर केला जाणार आहे. संघटनेच्या कारवायांना तेल, मौल्यवान वस्तूंची तस्करी आणि खंडणीद्वारे आर्थिक पुरवठा होताे. तो बंद करण्यात येणार आहे.

सुरक्षा परिषदेच्या आगामी बैठकीत ठरावाचा मसुदा मांडण्यात येणार आहे. रशियाने हा मसुदा तयार केला आहे. सदस्य राष्ट्रांना तो देण्यात येईल. अमेरिका आणि युरोप यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा मसुदा तयार करण्यात आला आहे. आगामी बैठकीत त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल. ठरावाला ब्रिटनकडून विरोध झाला आहे. यातून काहीही साध्य होणार नाही. ठराव म्हणजे आणखी एक वैधानिक कृती ठरेल. त्या पलीकडे याचे महत्त्व नाही, असे ब्रिटनचे राजदूत मार्क लॉल ग्रँट यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे अशा प्रकारची बंधने नक्कीच आशादायी वाटू लागतात; परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणीचा प्रश्न निर्माण होतो, असे अमेरिकी अधिकार्‍याने म्हटले आहे. त्याचबरोबर पुढील आठवड्यात हा ठराव स्वीकारण्यात यावा; परंतु त्यात दहशतवाद्यांचा कोण मुकाबला करणार हेदेखील त्यात स्पष्ट असले पाहिजे, असे अमेरिकी अधिकार्‍याने म्हटले आहे.

सिरियातून कलात्मक साहित्यावर बंदी
सिरियावर आयएसने ताबा घेतलेला आहे. त्यामुळे सिरियातून भविष्यात कोणत्याही प्रकारचे कलात्मक साहित्य, दुर्मिळ वस्तू यांचा परदेशात व्यवहार केला जाणार नाही. त्यावर निर्बंध आणले जाणार आहेत. अशाच प्रकारची बंदी इराकमध्ये सध्या लागू आहे. दुर्मिळ वस्तूंची तस्करी करून दहशतवादी पैसा उभा करतात, असे आढळून आले आहे.

नोव्हेंबरच्या अहवालात धक्कादायक माहिती
संयुक्त राष्ट्राने नोव्हेंबरमध्ये दहशतवाद्यांच्या आर्थिक पुरवठ्यावर एक अहवाल जाहीर केला होता. त्यात आयएस संघटना दर दिवशी तेलाची विक्री करून सुमारे ८ लाख ५० हजार ते १. ६५ दशलक्ष डॉलर्स रुपये मिळवतात. हे तेल खासगी कंपन्यांना विकले जाते. त्यांचे अनेक ट्रक रोखण्यात आले आहेत.

मित्रराष्ट्रांच्या हल्ल्यात अमेरिकी महिलेचा मृत्यू
बैरुत - अमेरिकेसह मित्रराष्ट्रांच्या सिरियातील हवाई हल्ल्यात एका अमेरिकी महिलेचा मृत्यू झाला, असा दावा इस्लामिक स्टेटच्या वतीने करण्यात आला आहे. अमेरिकेने मात्र महिलेच्या मृत्यूला दुजोरा दिलेला नाही. उलट ती अफवा असल्याचे म्हटले आहे. सदर महिलेस ओलिस ठेवण्यात आले होते. ही घटना सिरियात घडली. कायला जीन मुलर असे मृत ओलिस महिलेचे नाव आहे. मीडियाने आयएसच्या दाव्याची सत्यता पडताळून पाहावी, अशी विनंती मुलर यांच्या कुटुंबीयांनी केली.
बातम्या आणखी आहेत...