आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिमियाचा ताबा घेणार रशिया; युरोपमधील शांतता धोक्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कीएव - युक्रेनच्या मुद्दय़ावरून रशिया आणि पश्चिमी देशांमधील संबंध शीतयुद्धानंतर सर्वाधिक बिकट अवस्थेत पोहोचले आहेत. युक्रेनच्या क्रिमिया भागातील सर्व प्रमुख ठिकाणांवर रशियन लष्कराने नियंत्रण मिळवल्याचे वृत्त आहे. प्रत्युत्तरादाखल युक्रेनने लष्कराला सीमेकडे कूच करण्याचे आदेश दिले असून 40 वर्षांपर्यंतच्या सर्व नागरिकांना (राखीव) तैनातीसाठी सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.


रशियाने हल्ला करण्याची धमकी दिलेली असतान युक्रेनने जागतिक समुदायाला देश वाचवण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेसह पश्चिमी देशांनी रशियाच्या या कृतीमुळे युरोपमधील शांतता धोक्यात आल्याची टीका केली आहे. रशिया जी - 8 समूहातून बाहेर पडू शकतो, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. युक्रेनचे कार्यकारी राष्ट्रपती अलेक्झांडर तुरचिनोव्ह यांनी जागतिक समुदायाकडे मदतीसाठी साकडे घातले आहे. त्यांनी रविवारी सांगितले की, रशिया युक्रेनमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण करत आहे. युक्रेन विनाशाच्या उंबरठय़ावर आहे. युक्रेेनच्या संसदेने रविवारी स्पष्ट केले की, त्यांच्या लष्कराने रशियाला उत्तर देण्यासाठी कूच केली आहे. संसदेने अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांना अणुकेंद्रांवर देखरेख करण्याचे आवाहन केले आहे.


क्रिमिया ताब्याची प्रक्रिया पूर्ण : दावा
युक्रेनने क्रिमियाच्या किनार्‍यांवरील कोस्ट गार्डच्या दोन जहाजांना हटवले आहे. या क्षेत्रावर रशियन लष्कराने पूर्ण ताबा मिळवल्याचे ते संकेत असल्याचे म्हटले जात आहे. बॉर्डर गार्डने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, कोस्टगार्डची दोन जहाजे कर्च व सेवास्टोपोलच्या बंदरांमधून दुसरीकडे जात आहेत. क्रिमिया सोडून इतर सीमांवर शांतता आहे.

सुरक्षेसाठी हल्ला : रशिया
दरम्यान, रशियाच्या नागरिकांच्या रक्षणासाठी आम्हाला युक्रेनवर हल्ला करण्याचा अधिकार आहे, असा दावा रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी केला आहे. अमेरिकन राष्ट्रपती बराक ओबामा आणि पुतीन यांच्यात दीड तास चर्चा झाली. ओबामांनी युक्रेनवर हल्ला न करण्याचे व क्रिमियातून रशियन लष्कर मागे घेण्याचे आवाहन पुतीन यांना केले. रशियाने युक्रेनवर हल्ला केला तर सोचीमध्ये होणार्‍या जी - आठ संमेलनात सहभागी न होण्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी विकसित देशांच्या जी - आठ समूहातून रशियाची हकालपट्टी करण्याचा इशारा दिला आहे. कॅनडानेही रशियातून त्याच्या राजदूताला माघारी बोलावले आहे.