नवी दिल्ली - भारत-रशियादरम्यान गुरुवारी ऊर्जा, पेट्रोलियम आणि खतासह अनेक क्षेत्रांत २० करार करण्यात आले. यात रशियाच्या मदतीने भारतात १२ आण्विक विद्युत प्रकल्प उभारण्याच्या कराराचाही समावेश आहे. भारत दौ-यावर आलेले रशियाचे अध्यक्ष ब्लादीमिर पुतीन व पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्यादरम्यान झालेल्या शिखर बैठकीनंतर या करारांवर स्वाक्ष-या करण्यात आल्या.
परदेशी कंपन्यांनी भारतात उद्योग उभारून उत्पादन करावे व त्याची निर्यात करावी, या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ अभियानात गुरुवारी नवा भागीदार जोडला गेला. रशिया
आपल्या सर्वांत आधुनिक म्हणून ओळखल्या जाणा-या हेलिकॉप्टरची आता भारतात निर्मिती करणार आहे. पुतिन यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत स्वत: मोदींनी ही घोषणा केली.
आगामी काळात भारतात निर्मित आपल्या शस्त्रास्त्रांचीही रशिया निर्यात करू शकेल.
पुतिन व मोदी यांच्यात झालेल्या शिखर बैठकीनंतर मोदी म्हणाले, भारत व रशियातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या हेतूने दोन्ही देशांत करार झाला असून यानुसार पाचव्या पिढीची लढाऊ विमाने तसेच आधुनिक मालवाहू हेलिकॉप्टरची निर्मिती भारतात करण्यास रशिया राजी झाला आहे. भारत ज्या शस्त्रास्त्रांची रशियाकडून खरेदी करतो त्याची निर्मितीही भारतातच व्हावी, असा सल्ला मोदींनी या भेटी पुतिन यांना दिला. सुखोई-३० या लढाऊ विमानांची रशिया लवकरच भारतात निर्मिती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दहा वर्षांचे व्हीजन डाक्युमेंट
मोदी म्हणाले...
रशिया हायड्रोकार्बनचा सर्वांत मोठा उत्पादक तर भारत सर्वांत मोठा आयात करणारा देश आहे. या क्षेत्रात सहकार्यासाठी खूप संधी आहेत. यासोबतच इतर सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रांत दोन्ही देशांत सहकार्य असेल.
पुतीन म्हणाले...
सन २००० मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळात मोदींची भेट झाली होती. तेव्हापासून मी मोदींना ओळखतो. आज ते वेगळ्या भूमिकेत आहेत.
भारत-रशियादरम्यानचे करार
संरक्षण :
-अत्याधुनिक केए २२६ या हेलिकॉप्टरची भारतात निर्मिती केली जाईल. दर वर्षी सुमारे ४०० हेलिकॉप्टर तयार होतील.
- भारतीय लष्करातील जवानांना रशियात प्रशिक्षण.
ऊर्जा : -रशियाची सरकारी कंपनी रोजाटम २० वर्षांत १२ अणुभट्टया देणार. कुडनाकुलम
आण्विक प्रकल्पाच्या दोन युनिटसाठी उपकरणेही पुरवणार.
- रशियाच्या ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी टाटा पॉवर व रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडदरम्यान करार.
- ऑईल इंडिया व जारुबेझनेफ्टमध्ये हायड्रोकार्बनचा शोध व उत्पादनासाठी करार.
इतर करार : रशियन सरकारी कंपनी अलरोजाकडून भारताला कच्चे हिरे, फिक्की-देलोवाया यांच्यात आर्थिक सहकार्य वाढविणार.