आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Russia Will Not Invade Eastern Ukraine, Foreign Minister Says

युक्रेनमध्ये फौजा पाठवणार नाही : रशियाकडून ग्वाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - युक्रेनमधील वाढता तणाव आणि सरहद्दीवर रशियन फौजांची जमवाजमव या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांचे रशियन समपदस्थ व्लादिमीर पुतीन यांच्यात शनिवारी फोनवर चर्चा झाली. त्यानंंतर युक्रेनमध्ये आणखी सैन्य पाठवणार नाही, असे रशियाने जाहीर केले. मुत्सद्देगिरीच्या मार्गाने या प्रकरणी तोडगा काढण्यात यावा असा प्रस्ताव अमेरिकेने दिला आहे. यासंदर्भात उभय नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. दरम्यान, युक्रेनमध्ये तणाव कायम असून एक ठिणगी पडताच युद्धाचा भडका उडू शकतो, असा इशारा संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनी दिला आहे.

रशिया युक्रेनमध्ये आणखी फौजा पाठवणार नाही. या भागातील रशियन भाषिक नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करण्यास रशिया तयार आहे. क्रिमियात सैन्य असले तरीही युक्रेनची सरहद्द पार करण्याचा रशियाचा इरादा नाही, असे रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हारोव यांनी शनिवारी स्पष्ट केले.

ओबामा सध्या सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर आहेत. त्यांना पुतीन यांनी फोन केला. युक्रेन समस्येवर तोडगा काढण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी रशियन विदेशमंत्री सर्गेई लाव्हरोव यांना हेग येथील बैठकीत एक प्रस्ताव सादर केला होता. त्यावर ओबामा आणि पुतीन यांची प्रदीर्घ चर्चा झाली. अमेरिका अणि युरोपियन संघाने रशियन अधिकार्‍यांवर निर्बंध टाकल्यानंतर पुतीन-ओबामा यांच्यातील चर्चा महत्त्वपूर्ण समजली जात आहे. क्रिमियातून फौजा माघारी घ्याव्यात यासाठी अमेरिका रशियावर दबाव टाकत आहे.

रशियाला वाळीत टाकण्यासाठी भारताला साकडे
वॉशिंग्टन । युक्रेनमधील वाढता तणाव आणि सरहद्दीवर रशियन फौजांची जमवाजमव या पार्श्वभूमीवर रशियाला वाळीत टाकण्यासाठी अमेरिकेने भारत आणि चीनसह विविध देशांशी बोलणी सुरू केली आहे. निर्बंध टाकण्यास मात्र सांगण्यात आलेले नाही, असे एका अमेरिकी अधिकार्‍याने सांगितले. इतर देशांशीही अमेरिकेची चर्चा सुरू आहे. गेल्या आठवड्यात संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत झालेल्या मतदानात चीनचा प्रतिनिधी गैरहजर होता. त्याने रशियाच्या बाजूने मतदान केले नाही, याकडे अमेरिकी प्रशासनाच्या प्रवक्त्याने लक्ष वेधले.

(फोटो - सौदी अरेबियाच्या राष्ट्रीय कुटुंब सुरक्षा मोहिमेच्या कार्यकारी संचालक महा अल मुनीफ यांना रियाध येथे आंतरराष्ट्रीय महिला शौर्य पुरस्कार प्रदान करताना बराक ओबामा.)