लंडन - भारतीय वंशाचे बुकर विजेते लेखक सलमान रश्दी यांना साहित्य विश्वातील प्रतिष्ठेचा पेन पिंटर पुरस्कार जाहीर झाला आहे. दर्जेदार ग्रंथसंपदा व अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानासाठी रश्दी यांची निवड करण्यात आली आहे.
पुरस्कार समितीचे अध्यक्ष मॉरिन फ्रिली यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. हा केवळ पुरस्कार नाही. त्यांची पुस्तके, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी अनेक वर्षांपासून ते देत असलेली व्याख्याने, वैयक्तिक पातळीवरील त्यांची ऋजुता, परोपकारी वृत्ती याबद्दल इंग्लिश पेन त्यांचे पुरस्काराच्या माध्यमातून आभार व्यक्त करत आहे, असे फ्रिली यांनी सांगितले. या अगोदर टोनी हॅरिसन, हानिफ कुरेशी, डेव्हिड हेरे, कॅरोल अॅन डफी, टॉम स्टॉपर्ड यासारख्या मोठ्या लेखकांचाही या पुरस्काराने गौरव झाला आहे. दरम्यान, लंडनमधील ब्रिटिश लायब्ररीमध्ये 7 ऑक्टोबर रोजी होणा-या समारंभात रश्दी यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.