सॅनफ्रान्सिस्को - जन्मदर नियंत्रित करणार्या पहिल्या वैद्यकीय रसायनाचा शोध लावणारे शास्त्रज्ञ कार्ल डिजेरसी यांचे (९१) नुकतचे निधन झाले. जन्मावर नियंत्रण ठेवणारा "बाप' म्हणून ओळखले जाणारे डिजेरसी कर्करोगाने पीडित होते. शुक्रवारी सॅनफ्रान्सिस्को येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाल्याची माहिती स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या प्रवक्त्याने दिली.
स्टॅनफोर्डमध्ये रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डिजेरसी यांच्या नेतृत्वाखालील एका संशोधकाच्या पथकाने १९५१ मध्ये मेक्सिको शहरात जन्मनियंत्रणामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणार्या नाेरिथिंड्रोम या पहिल्या कृत्रिम परमाणूचा शोध लावला होता. या आधारे नंतर औषधाची निर्मिती केली होती. या औषधाच्या गोळीमुळे जन्मदरावर नियंत्रण मिळवता आले. विशेषत: महिलांसाठी हे औषध अत्यंत गुणकारी ठरले.
"धिस मॅन्स पिल' : डिजेरसी यांनी "धिस मॅन पिल' या पुस्तकात विज्ञानातील शोध प्रत्यक्ष मानवी जीवनावर केवढा मोठा परिणाम करतात यावर भाष्य केले होते. पुरुषांसाठी अशा प्रकारची औषधे कशी उपयुक्त ठरू शकतात, यावर त्यांनी १९७० मध्ये एका लेखातून भाष्य केले होते. मानवी जन्मदर नियंत्रणासाठी प्रत्यक्ष विज्ञानापेक्षा राजकीय इच्छाशक्तीच उपयुक्त ठरू शकते, असे त्यांचे मत होते.डिजेरसी यांचा जन्म २९ ऑक्टोबर १९२३ रोजी व्हिएन्नात (ऑस्ट्रिया) झाला. रसायनशास्त्रातील डॉक्टरेट मिळवल्यानंतर त्यांनी याच क्षेत्रात आयुष्यभर संशोधन केले. त्यांच्या अनेक संशोधनाना पेटंट मिळाली होती.