आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील मलेरियाच्या दोन जनुकीय रचनांचा शोध

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - भारतातील 65 टक्के मलेरिया रुग्णात आढळणा-या मलेरियाच्या दोन जनुकांचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. या संशोधनामुळे मलेरियावरील नवी लसी तयार करण्यास मदत होईल, असे मानले जाते.
भारताच्या मलेरिया संशोधनाच्या राष्ट्रीय संस्थेचा या संशोधनात सहभाग आहे. शास्त्रज्ञांनी प्लासमोडियम विवॅक्स (पी. विवॅक्स) घटकावर संशोधन केले. आफ्रिकेव्यतिरिक्त आढळणा-या मलेरिया विषाणू प्रजातीशी संबंधित पी. विवॅक्स घटक आहे. भारतातील 60-65 टक्के मलेरिया रुग्णांमध्ये पी. विवॅक्स आढळून येते. न्यूयॉर्क विद्यापीठाच्या जिनोमिक्स अ‍ॅँड सिस्टिम बायलॉजी या विभागातील शास्त्रज्ञ जेन कार्लटन यांच्या नेतृत्वाखाली संशोधन करण्यात आले. पी. विवॅक्समध्ये मोठ्या प्रमाणात जनुकीय बदल आढळून आले, ही आपल्यासाठी वाईट बातमी आहे. पश्चिम आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि आशियातील मलेरिया विषाणूच्या बदलत्या प्रकारातील पी.विवॅक्स पेशी समूहाचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. जगातील अन्य भागाच्या पी. फाल्सीपेरम समूहाच्या तुलनेत भारतातील पी. विवॅक्समध्ये दुप्पट जनुकीय बदल आढळून आले. पी. विवॅक्सच्या जनुकीय क्रमवारीच्या संशोधनात ब्रॉड इन्स्टिट्यूट, ऑरिझॉन विद्यापीठाचा सहभाग राहिला आहे. कार्लटन यांच्यासह जपानच्या ओसाका विद्यापीठातील प्रो. काझुयुकी तान्बे यांनी पहिल्यांदाच प्लासमोडियम सायनोमॉल्जी जनुकाची क्रमवारी निश्चित केली.
नैर्ऋत्य आशियात माणसांसह माकडांत आढळणा-या प्लासमोडियम नोल्सीसोबत (पी.नोल्सी) पी. विवॅक्सची तुलना करण्यात आली. पी. विवॅक्सची भगिनी प्रजाती पी. सायनोमॉल्जीचा आराखडा तयार केला आहे. यामुळे पी. विवॅक्सच्या अभ्यासाठी मॉड्यूल तयार करण्यास मदत मिळेल, असे तान्बे यांनी म्हटले आहे.
रामबाण शोधणे शक्य - मलेरिया आजाराला दूर ठेवण्यासाठी जेवढी औषधे वापरली जातात, त्याच्याशी पी. विवॅक्स जुळवून घेतात. त्यामुळे आजारातून लवकर मुक्ती मिळणे कठीण ठरते. मलेरिया विषाणूच्या जनुकीय बदलाचा अभ्यास करूनच त्यावर मात करता येईल, असे कार्लटन यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.