आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Scotland News In Marathi, United Kingdom, Divya Marathi

किंगडम युनायटेडच : स्कॉटलंडने स्वातंत्र्य नाकारले, कौल ब्रिटनच्या बाजूनेच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - स्कॉटलंडने शुक्रवारी स्वातंत्र्य नाकारले. ब्रिटनपासून विभक्त होऊन स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा दिला जावा की नाही, यावर घेण्यात आलेल्या सार्वमतामध्ये जनतेने स्वातंत्र्य नाकारून ब्रिटनच्याच पारड्यात वजन टाकले. या सार्वमतानंतर ३०७ वर्षांपासून असलेल्या दोन प्रदेशांच्या नात्याची वीण अधिकच घट्ट झाली. आता स्कॉटलंड ब्रिटनचाच अविभाज्य भाग राहील.

या सार्वमतामध्ये मत नोंदवण्यासाठी ‘येस’ आणि ‘नो’ असे दोनच पर्याय जनतेसमोर ठेवण्यात आले होते. गुरुवारी राज्यात सर्वत्रच सकाळपासून नागरिकांनी मत नोंदवण्यासाठी रांगा लावल्या होत्या. हा उत्साह पाहून निकाल काय लागतो, याबद्दल ब्रिटिश प्रशासनही हवालदिल होते. मतमोजणीनंतर ५५ विरुद्ध ४५ टक्के या प्रमाणात नागरिकांनी स्वातंत्र्य नाकारल्याचे स्पष्ट झाले.

ग्लासगोचे येस!
स्कॉटलंडमधील सर्वात मोठे व ब्रिटनमधील तिस-या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर असलेल्या ग्लासगोतील जनतेने मात्र स्वातंत्र्याच्या बाजूने कौल दिला. यासोबतच डुंडी, वेस्ट डनबर्टनशायर आिण नॉर्थ लनार्कशायर या प्रदेशांनीही "येस'चा पर्याय निवडला. मात्र, देशभरातील एकूण सरासरी मतदानात "नो'ला मिळालेल्या बहुमतामुळे"येस'चे महत्त्व नाही.

राजधानीत "नो'
एडिनबर्ग ही स्कॉटलंडची राजधानी. मात्र, शहरातील लोकांनी
स्वातंत्र्य नाकारले. अबर्डिनसारख्या शहरानेही स्वातंत्र्याच्या विरोधातच कौल दिला.

अ‍ॅलेक्स सालमंड पराभूत
स्कॉटिश नॅशनॅलिस्ट पार्टीचे नेते व संपूर्ण स्वातंत्र्यासाठी अभियान चालवलेले अ‍ॅलेक्स सालमंड यांनी हा पराभव मान्य केला. जनतेच्या भावनेचा सन्मान करून आता ब्रिटनने स्कॉटलंडला अधिक स्वायत्तता देण्याच्या दृष्टीने गांभीर्याने विचार करावा, असे ते म्हणाले.

कॅमेरून आनंदित
ब्रिटनचे विभाजन टाळण्यासाठी स्कॉटलंडच्या जनतेने दिलेली साथ आणि या प्रक्रियेत नेत्यांनी केलेले प्रयत्न फळाला आले असल्याचे सांगून ब्रिटिश पंतप्रधान कॅमेरून यांनी आनंद व्यक्त केला.

ब्रिटनचा विरोध का?
युरोपियन युनियनमध्ये लागणा-या इंधन तेलापैकी ७५ टक्के उत्पादन एकट्या ब्रिटनमध्ये होते. त्यापैकी ९० टक्के तेल एकट्या स्कॉटलंडमध्ये उत्पादित होते. याशिवाय एकट्या स्कॉटलंडमधून १०० अब्ज पौंडांपेक्षा अिधक निर्यात होते. स्कॉटलंड स्वतंत्र झाले असते तर साहजिकच याचा आर्थिक फटका ब्रिटनला बसला असता.

स्कॉटलंड स्वतंत्र राष्ट्र असावे काय?
* "येस' किंवा "नो'
* ९७ टक्के लोकांनी मते नोंदवली
* ४,२८५,३२३ एकूण नोंदणीकृत मतदार
* २,६०८ मतदान केंद्रे

स्वातंत्र्य हवे कशाला?
सार्वमतात सहभागी व स्वातंत्र्याच्या बाजूने कौल देणा-या लोकांना स्कॉटलंडला जादा अधिकार मिळावेत असे वाटते. ब्रिटनमध्ये समाविष्ट असूनही सध्या स्कॉटलंडची वेगळी संसद आहे. शिक्षण, आरोग्य अशा अत्यावश्यक क्षेत्रासाठी वेगळे कायदे करण्याचा संसदेला अधिकार आहे. मात्र, संरक्षण, परराष्ट्र धोरण, रोजगार, उद्योग-व्यापार या क्षेत्रात ब्रिटनचेच धोरण स्वीकारावे लागते. स्वातंत्र्य मिळाले असते, तर स्वत:ची धोरणे निश्चित करून स्कॉटलंडची अर्थव्यवस्था आणखी सुधारता आली असती, अशी स्वातंत्र्यवादी लोकांची भावना आहे.